महाविद्यालयांकडून अर्ज पडताळणीस टाळाटाऴ : पालक संतापले
पुणे – पुणे विभागीय शिक्षण सहसंचालकांनी वांरवार सूचना देऊनही महाविद्यालयांकडून त्याची तात्काळ गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची बाब उघड झालेली आहे. अर्जच प्रलंबित पडल्यामुळे संबंधित विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. शिष्यवृत्तीच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्यासाठी एकूण 4 हजार 101 विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणीसाठी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याने या विद्यार्थ्यांवर शिष्यवृत्ती गमावण्याची वेळ येणार आहे.
महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती योजनांकरीता विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाईन अर्जाची पडताळणी महाविद्यालय स्तरावरुन वेळोवेळी परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत.
मात्र पुणे विभागातील महाविद्यालय, विद्यापीठ. संस्था स्तरावर सन 2019-20, 2020-21, 2021-22, 2022-23 या वर्षां मधील शिष्यवृत्तीचे अर्ज पडताळणीसाठी प्रलंबितच पडलेले आहेत. महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जावर रोजच्या रोज कार्यवाही करणे आवश्यक असताना. दुसऱ्या हप्त्याचेही अर्ज प्रलंबितच पडलेले आहेत.
यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्तीकरीता ऑनलाईन अर्ज करता येत नाहीत. पहिल्या हप्त्यासाठी 779 तर दुसऱ्या हप्त्यासाठी 3 हजार 322 विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबितच राहिलेले आहेत. अर्जात काही त्रुटी असल्याच त्याची पुर्तता करुन घेऊन ते निकाली काढण्याला महाविद्यालयांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे या आकडेवारीवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.
कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालय, संस्था, विद्यापीठाच्या स्तरावर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबितच राहणार नाहीत याची गांभीर्याने नोंद घेणे गरजेचे आहे. पडताळणीसाठी प्रलंबित राहिललेया अर्जांबाबत भविष्यात उद्भवणाऱ्या प्रश्नास संबंधित विद्यापीठातील कुलसचिव, महाविद्यालयातील प्राचार्यच सर्वस्वी जबाबदार राहणार आहेत, असे पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.केशव तुपे यांनी स्पष्ट केले आहे.