450 किलो भेंडी विक्री ः किलोला 32 रुपये भाव
15 गुंठे क्षेत्रात टोकण पद्धतीने लागवड
ऑगस्टमध्ये पेरणी, दसऱ्यापासून तोडणी
वीसगाव खोरे – नाव्ही (ता. भोर) येथील प्रगतशील शेतकरी दाम्पत्याने त्यांच्या 15 गुंठे क्षेत्रात पारंपरिक शेतीला फाटा देत सायली जातीच्या भेंडी वाणाची टोकण पद्धतीने लागवड केली. आता दर तीन दिवसांनी त्यांना 70 ते 80 किलो भेंडी मिळत आहे असून, डिसेंबर अखेर 800 किलो भेंडी मिळण्याची शक्यता आहे. दिवाळी सणातच भेंडीची विक्री तेजीत आल्याने त्यांची दिवाळी गोड झाली असून आतापर्यंत 450 किलो भेंडीची 30 ते 32 रुपये दराने विक्री झाली आहे.
नाव्ही (ता. भोर) येथील संदेश नामदेव सोनवणे आणि कमल संदेश सोनवणे या पती-पत्नीने खरीपातील घेवडा पीक काढणीनंतर कुळवाच्या उभ्या-आडव्या तीन फणपाळ्या देऊन जमीन भुसभुशीत केली. सरीला ओळीतील अंतर एक फुट, तर दोन रोपांतील अंतर एक फुट ठेवून बियाणांचे टोकण केले. भेंडीची लागवड ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या आठवड्यात केली. दर दोन आठवड्यानंतर बेणणी करून तण काढून टाकले.
जमीन काळी असल्याने पाण्याचा निचरा लगेच होत नसल्याने लिफ्टच्या सहायाने दर 10 दिवसांनी पाट पाणी दिले. भोर परिसरात हवामान उष्ण आणि सरासरी 20 ते 35 अंश सेल्सिअस असल्याने बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ झाली आणि फुलगळतीला आळा बसला आहे. भेंडी पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी रासायनिक खते वापर करताना भेंडीची लागवड वेळी 20 किलोप्रमाणे 20.20.0.13,1026 समर्थ, युरिया यांची मात्रा जमिनीत मिसळली. एक महिन्याच्या कालावधीने नत्राचा दुसरा हफ्ता 15 किलो प्रमाणात दिला.
भेंडीची रोपे पंधरा दिवस झाल्यावर मावा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हमला, रोगर 10 मिली प्रति 15 लिटर पंपाला फवारणी केली. दीड महिन्यांची रोपे झाल्यावर लाल कोळी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 80 टक्के पाण्यात विरघळणारे सल्फर 2.5 ग्रॅम प्रतिलिटर आणि इथिऑन 3 ग्रॅम प्रती लिटर कीटकनाशकाची फवारणी केली. भेंडीच्या फळात कॅल्शिअम आणि आयोडिन ही मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असल्याने मागणी जास्त असते.
फळे हिरवी व लुसलुशीत 10 ते 15 से. मी. लांब असलेल्या भेंडीची तोडणी घरातील सदस्य सकाळी करतात. गुलटेकडी मार्केटला भेंडीची घाऊक विक्री होते. भेंडी ताजी, दिसायला हिरवीगार, लुसलुशीत असल्याने काही वेळातच विक्री होते.आतापर्यंत 450 किलो भेंडीची विक्री 30 ते 32 रुपये दराने केली आहे. दर तीन दिवसांनी 70 ते 80 किलो भेंडी मिळत आहे. डिसेंबर अखेर 800 किलो भेंडी मिळण्याची आशा आहे.
– कमल संदेश सोनवणे, शेतकरी, नाव्ही (ता. भोर)