16 ते 20 नोव्हेंबर या दरम्यान धाराशिव येथे कुस्ती स्पर्धा
पिरंगुट – कुस्ती महर्षी कै. मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दरवर्षी महाराष्ट्र केसरीसाठी दिली जाणारी मानाची चांदीची गदा विधिवत पूजन मामासाहेब मोहोळ यांचे पुत्र माजी खासदार अशोक मोहोळ यांनी ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्याकडे सुपूर्द केली.
16 ते 20 नोव्हेंबर या दरम्यान धाराशिव येथे तुळजाभवानी स्टेडियमच्या मैदानावर 65वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. मामासाहेब मोहोळ यांनी पहिलवानांची संघटना उभी करून 2 ऑक्टोबर 1953 ला कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली. 1961पासून महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविणाऱ्या पहिलवानाला परिषदेकडून चांदीची गदा बहाल केली जात होती.
6 डिसेंबर 1982 रोजी मामासाहेबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ 1983 पासून त्यांचे पूत्र माजी खासदार अशोक मोहोळ यांनी ही चांदीची गदा देण्याचा उपक्रम सुरू केला. यावेळी माजी महापौर दिलीप बराटे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, माजी सभापती रवींद्र कंधारे, पुणे शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बुचडे, उपमहाराष्ट्र केसरी राजाभाऊ मोहोळ, ललित लांडगे, पंकज हारपुडे, प्रकाश मोरे, कुणाल मोहोळ, विक्रम मोहोळ, अनिकेत जाधव, विजय मोहोळ, मनोज साठे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संग्राम मोहोळ यांनी केले. यावेळी चंद्रकांत मोहोळ यांनी आभार मानले.
अशी असते महाराष्ट्र केसरीची गदा
उंची – 29 ते 35 इंच
व्यास – 11 ते 13 इंच
वजन – 13 ते 15 किलो
अंतर्गत धातू – सागवानी लाकडावर कोरीव काम आणि आकर्षक पिळे
बाह्य धातू -38गेज जाड शुध्द चांदीचा पत्रा, त्यावर कोरीव काम आणि झळाळी
गदेचं बाह्यरुप -मध्यभागी मामासाहेब मोहोळ यांची वर्तुळाकृती प्रतिमा चांदीच्या कोंदणात बसवलेली असते.