उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती – बारामतीसह राज्यातील पाच विमानतळांची देखभाल अनिल अंबानी यांच्या कंपनीकडून केली जाते. तेथे सध्या नाइट लॅण्डिंगची सोय नाही, परंतु लवकरच या ठिकाणीही नाइट लॅण्डिंगची सोय केली जाणार आहे. बारामतीसह अन्य विमानतळांचा त्यात समावेश आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुण्यातील विमानतळाचा विस्तार केला गेला आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन केले जाणार आहे. बारामतीसह राज्यातील लातूर, धाराशिव, नांदेड अशा ठिकाणाची विमानतळे सध्या अनिल अंबानी यांच्याकडे देखभालीसाठी आहेत. त्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही.
परंतु, ते देखभालीचे कामही सोडत नाहीत. आता त्या कंपनीला नोटीस दिली आहे. त्यानंतर या ठिकाणी मोठी विमाने उतरवता येतील, अशी सुविधा केली जाणार आहे. बारामतीतही नाइट लॅण्डिग व्हावे, यासाठी मी आवश्यक ते प्रयत्न करत आहे, असे पवार म्हणाले.
पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न सोडवणार
मुंबई, पुणे येथील विमानतळावरील ताण कमी करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी सध्या अंबानींकडे असलेल्यां विमानतळांवरही नाईट लॅण्डिंग सुरू केले जाईल. याशिवाय जिल्ह्यात पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी एकत्र बसूने लवकरात लवकर पुरंदर विमानतळाचा प्रश्न मार्गी लावू. तेथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, धाराशिव आदी जिल्ह्यांचा प्रश्न सुटणार असल्याचे पवार यांनी सांगितले.