दौंड – शहरातील छायाचित्रकाराचा कालव्यालगत अज्ञातांकडून खून करण्यात आला आहे. रविवार (दि.4) सकाळी मृतदेह आढळून आल्यानंतर खुनाला वाचा फुटली. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच मोठी खळबळ उडाली आहे. भागवत यांच्या खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. केदार भागवत (वय 46, रा. शालीमार चौक, दौंड), असे खून झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड – लिंगाळी रस्त्यालगत काळे मळा येथील कालव्यालगत (दि.4) सकाळी साडेनऊ वाजता केदार भागवत यांचा मृतदेह आढळून आला. डोक्यात दगड घालून व बाटली फोडून खून करण्यात आला आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
प्रभारी पोलीस उप अधीक्षक नारायण शिरगावकर (बारामती), पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक म्हणाले की, भागवत यांचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे आढळून आले आहे. सर्व शक्यता विचारात घेऊन खुनाचा तपास केला जात आहे.