आठ दिवसांपासून शहरातील बाधित रुग्ण संख्या कमी
पुणे – मागील आठ दिवसांपासून शहरातील करोनाबाधित संख्येचा आलेख दिवसेंदिवस खाली येत आहे. ही सकारात्मक बाब असून आज ही संख्या एक हजाराच्याही खाली आली. दिवसभरात 993 इतके रुग्ण सापडले, त्यापेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक 1 हजार 428 आहे.
शहरातील नमुने तपासणीची संख्या घटल्यामुळे ही बाधित संख्या घटली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, महापालिकेने दर्शविलेल्या आकडेवारीमध्ये आठ दिवसांपासून बाधित संख्या कमी होत असल्याचे स्पष्ट केले आहे. शहरातील बाधित संख्या कमी होते, ही बाब जरी सकारात्मक असली तरी ऑक्टोबरमध्ये सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत निम्म्याने बाधित संख्या कमी झाली तरच बाधितांची संख्या घटली असे म्हणता येईल.
कारण, जुलै आणि ऑगस्टमध्ये अशाप्रकारे बाधित संख्या कमी होऊ लागली, अशी शक्यता वर्तवली आणि सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक बाधितांची नोंद झाली. शहरात आज दिवसभरात 4 हजार 580 संशयितांची तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत 6 लाख 47 हजार 600 जणांची तपासणी करण्यात आली आहे.
2 हजार 965 जण ऑक्सिजनवर…
शहरातील बाधित संख्या दीड लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.2 हजार 965 जणांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे. आतापर्यंत 1 लाख 30 हजार 353 बाधित करोनामुक्त झाले आहेत. बाधित संख्या घटल्यामुळे सक्रिय बाधितांची संख्याही कमी 15 हजार 399 पर्यंत खाली आली आहे. त्यामध्ये 899 जणांची प्रकृती चिंताजनक असून 504 बाधित व्हेंटिलेटर तर 395 बाधित आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.