राज्यमंत्री भरणे यांच्या प्रयत्नांतून 348 कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता
इंदापूर/भवानीनगर – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या 348 कोटीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
गेल्या 25 वर्षांपासून इंदापूर तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत चर्चेत येणाऱ्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या 348.11 कोटी रुपये इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा विषय होता. यासाठी भरणे यांनी कसोशीने प्रयत्न केले अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील 10 गावांमधील 4337 हेक्टर क्षेत्र व बारामती तालुक्यातील 7 गावांमधील 2913 हेक्टर असे एकूण 7250 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामुळे तालुक्यातील दुष्काळी गावातील जिरायती शेती बागायती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या योजनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 348 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, खा. सौ. सुप्रिया सुळे यांचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आभार
मानले आहेत.
लाकडी – निंबोडी ही योजना या परिसरासाठी महत्वाची आहे. ही योजना 30 वर्षांपासून रखडली होती. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या योजनेची माहिती घेतली. तसेच ती पूर्ण करण्यासाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न शासन दरबारी पोहोचवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काही महिन्यात इंदापूर व काटेवाडी येथे शेतकरी मेळाव्यात या योजनेबाबत संकेत दिले होते. यासाठी प्राथमिक मंजुरी देखील घेण्याचे काम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
आता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने लाकडी – निंबोडी उपसा सिंचन योजना ही भीमा (उजनी) प्रकल्पाचाच भाग असल्याने या योजनेस प्राधिकरणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही, असे कळविले आहे. त्यानुसार लाकडी निंबोडी उपसा सिंचन या योजनेस एकूण रुपये 348.11 कोटी इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात
आली आहे.
अशी आहे योजना
लाकडी – निंबोडी योजनेचा भूमिपूजन शुभारंभ राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या हस्ते करणार असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले आहे. कुंभारगांव परिसरातून साधारण 765 हॉंर्स पॉवर क्षमतेच्या चार विद्युत पंपाच्या साहाय्याने हे पाणी उचलून शेटफळगडे आणि निरगुडे च्या सीमेवर टाकले जाईल. 640 हॉर्स पॉवरचे 3 पंप व 570 हॉर्स पॉवरचे दोन विद्युत पंप त्या ठिकाणी बसवले जातील. त्यामुळे या योजनेतून इंदापूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील 11 हजार एकर शेती ओलिताखाली येणार आहे.
दहा गावांत पेढे वाटून जल्लोष
या योजनेचा लाभ इंदापूर तालुक्यातील दहा गावांना होणार आहे. यामध्ये लामजेवाडी, शेटफळगडे, म्हसोबावाडी, निरगुडे, लाकडी, निंबोडी, शिंदेवाडी, काझड, वायसेवाडी, धायगुडे वाडी अकोले तर बारामती तालुक्यातील कटफळ, सावळ, जैनकवाडी, पारवडी, कन्हेरी, काटेवाडी, गाडीखेल आशा सात गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. येथीलग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.