दर घसरल्याने शेतकरी हतबल : दूध संघांची मनमानी सुरूच
बेल्हे – यंदा पावसाने दडी मारल्याने जुन्नर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम हा जसा शेतीवर झालाय तसाच दुग्धव्यवसायावर देखील झाला आहे. अनेक भागात चारा टंचाईला सुरुवात झाली आहे. शेतीला जोडधंदा असणाऱ्या दूध व्यवसायावर परिणाम झाला आहे. दूध दरात मोठी घसरण झाली आहे. 34 रुपयापर्यंत गेलेले दर आता 28 रुपयांवर आले आहेत. तर दुसरीकडे चाऱ्याचे व पशुखाद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. दुधाळ जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना आता अवघड जात आहे.
पावसाने हात आखडता घेतल्याने जनावरांचा चारा खराब झाला. यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. एकूणच काय तर कर्ज काढून जनावरे खरेदी केली, मात्र चारा प्रश्नामुळे गावातील शेतकऱ्यांचा आणि दुग्ध व्यवसायिकांचे आर्थिक गणित पुरत कोलमडले आहे. ज्याचा परिणाम इतरही व्यवसायांवर झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गेल्या तीन महिन्यांत दूध दर प्रति लिटर पाच रुपयांनी घसरले आहेत. दिवाळीला दूध दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांची दिवाळी कडू होण्याची शक्यता आहे. सरकारी अध्यादेशाला दूध संघांनी केराची टोपलीत टाकून मनमानी कारभार सुरू केला आहे. टप्प्याटप्प्याने दूध दरात मोठी घसरण होत चालली आहे. मे जून महिन्यात गायींच्या दूध दरात 38 रुपयांचा उच्चांक नोंदवला होता.
शासनाने अध्यादेश काढून कमीतकमी 34 रुपये दरापेक्षा कमी दर देऊ नये, असे स्पष्ट केले होते. परंतु आता अध्यादेश काढल्यापासून दूध घरात घट होत आहे. जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबर या तीन महिन्यात पाच रुपयांनी दूध दर कमी झाले. तर दिवाळी सणाच्या तोंडावरच मोठी घसरण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
सरकारचे नियंत्रण नसल्यानेमुळे दूध संघांची मनमानी सुरू आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आथिर्क फटका सहन करावा लागत आहे. तरी देखील येऊ घातलेल्या दुष्काळाची चाहूल लक्षात घेता शासन प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून चाऱ्याचं नियोजन सरकारने करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
ऐन दिवाळीत दुधाचे दर कमी झाले आहेत. पशु खाद्याचे दर वाढल्याने महिन्याचा 700 ते 800 रुपये खर्च वाढला आहे. दुग्ध व्यावसायिक शेतकरी जेरीस आले असून पशुखाद्य, डॉक्टर यांचा मोठा खर्च आहे. शेतकऱ्याला मिळणारा दूध दर व प्रत्यक्ष ग्राहकाला मिळणार दूध दर यात खूप तफावत आहे.
– संभाजी बांगर, दूध उत्पादक शेतकरी, बेल्हे