उत्सवानिमित्त 101 तोळ्यांचा सुवर्ण मुकुट अर्पण करण्यात येणार
पौड – खारावडे (ता. मुळशी) येथील श्री म्हसोबा देवाचा वार्षिक उत्सव मंगळवारी (दि. 23) चैत्रशुद्ध पोर्णिमा हनुमान जयंतीच्या होणार आहे.
यावर्षी यात्रेनिमित्त म्हसोबा देवाच्या मूर्तीला 101 तोळ्याचा सुवर्ण मुकुट अर्पण करण्यात येणार आहे. हा मुकुट भाविकांनी देणगी स्वरूपात दिलेल्या पैशातून करण्यात आला आहे. पुण्यातील पीएनजी ब्रदर्सचे अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला आहे. या उत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण परिसर मांडव फुलहारांच्या सजावटीमुळे प्रसन्न झाला आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने उत्सवाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
उत्सवानिमित्त येणार्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्ट करून पार्किंगची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. दर्शनासाठी येणार्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी देवस्थान ट्रस्टकडून घेण्यात येणार आहे, अशी माहिती म्हसोबा देवस्थानच्या अध्यक्षा मधुरा भेलके यांनी दिली. तसेच यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार वारकरी संप्रदायातील परमआदरणीय शांतीब्रह्म श्री मारुती बुवा महाराज कुल्हेकर यांना देण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे श्री म्हसोबा देवास महारुद्र अभिषेक, पालखी, छबिना अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रेनिमित्त उपस्थित राहावे अशी विनंती म्हसोबा देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आली आहे