पारगाव – दि. 24 डिसेंबर रोजी मराठ्यांचे कल्याण होणार, अशी ग्वाही मनोज जरांगे पाटील यांनी दिली. वरवंड (ता. दौंड) येथे मराठा आरक्षणासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांची तिसऱ्या टप्यातील आंदोलनाची जंगी विराट सभा झाली. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत अल्टीमेटमची आठवण करून दिली.
जरागे म्हणाले की, मी खानदानी शेतकऱ्याचा पोरगा आहे. त्यामुळे कुठंही माग न सरता आरक्षण मिळवून देणारच, असा आत्मविश्वास त्यांनी या वेळी बोलून दाखविला. राज्यात कुणबीचे लाखोंच्या संख्येने पुरावे राज्यात सापडले आहेत.
70 वर्षे पुरावे नाही म्हणणारे आता पुरावा दाखवतात. ते कोणी लपवले.त्यामुळे मराठा पोरांचे नुकसान झाले. 70 वर्षे ओबीसी नेत्यांचा किती प्रभाव होता, हे यावरून लक्षात येते, असे ही ते म्हणाले. मराठा पोरांना आरक्षण नाही. त्यामुळे देशोधडीला लागले. आरक्षण घेऊन 24 डिसेंबरला पोरांचे कल्याण करणारच.
काबाड कष्ट करून शिकवलेले पोरगं एक मार्काने स्पर्धा परीक्षेत नापास झाला. तेंव्हा बाप ओरडून म्हणाला की, आम्हाला आरक्षण का नाही. आपल्या लेकराला आपणच न्याय दिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून घराघरातील व गावागावातील मराठा आपल्या लेकराला न्याय देण्यासाठी एकजूट झाल्याने या प्रचंड त्सुनामीपुढे सरकारला नमते घ्यावे
लागले आहे.
70 टक्के लढा जिंकला आहे. जे आपले नाहीत त्यांना तुम्ही मोठे केले. आता आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय कुणाचाही प्रचार करायचा नाही. आपल्या लेकरांच्या भविष्याशी हे लोक खेळ खेळले आहेत.
मराठा समाजातील कार्यकर्त्यांना पुढे करून आरक्षण नको म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला समजावून सांगा. राजकीय नेत्याचे नाव न घेता जरांगे पाटील म्हणाले. बॅनर फाडणाऱ्याला परत गुलाल लागू देणार नाही. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिली जाणार आहेत, यात तिळमात्र शंका नाही.
सकाळी होणारी सभा ही चार तास उशिराने 3 वाजता झाली. तरी लोकांचा उत्साह कायम होता. सभेपूर्वी शिव शाहीर घोगरे यांनी पोवाड्याचा कार्यक्रम सादर केला. आंतरवली सराटी येथील मुख्य समन्वयक प्रदीप सोळंके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची माहिती व दिशा सांगितली.
डिसेंबरनंतर साखळी उपोषण करा
जरांगे म्हणाले की, दि. 24 डिसेंबरनंतर गाव तिथे साखळी उपोषण सुरू करा, असे आवाहन करीत मराठा समाजाची एकजूट दाखविली आहे. कायदा करून मराठा समाजाला आरक्षण नाही दिले तर एकत्रित बसून पुढील दिशा ठरविली जाईल. पण मात्र ती सरकारला फार जड जाईन, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला.
मी कोणालाच मॅनेज होत नाहीत
ते म्हणाले की, स्वत: च्या लेकरासाठी लढा आणि आरक्षण मिळवा. त्यानंतर कोणाचाही प्रचार करा. जरांगे पाटील हे कोणालाच मॅनेज होत नाहीत ही तर त्यांची खास खासियत असल्याचे त्यांनी सांगितले.