सरपंच परदेशी यांचा पहिल्याच दिवशी निर्णय
मलठण – दौंड तालुक्यातील मलठण येथील नवनिर्वाचित सरपंच पारूबाई परदेशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी ग्रामस्थांना मोफत पिण्याचे शुद्ध पाणी देण्याचा लोकहिताचा निर्णय घेतला. आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याने नागरिकांनी स्वागत केले.
पूर्व भागातील मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक असणाऱ्या मलठण ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले होते. मतदारांनी धक्कादायक कौल देत प्रस्थापित राजकारण्यांना फाटा देत अपक्ष नवा चेहरा निवडला. राजकारणात काहीही होऊ शकते, हे दाखवून दिले आहे. जाती- पातीच्या पलीकडे जाऊन मतदारांनी आपला कौल दिला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित सरपंच यांनी सर्व सदस्यांची बैठक आयोजित करून ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी जी. के. भांड यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपावलीपूर्वीच गिफ्ट
भीमा नदी भागात प्रामुख्याने सर्वत्र दूषित पाणी झाले आहे. दूषित पाण्यामुळे आरोग्यास धोका आहे. त्यामुळे मलठण परिसरातील सर्व नागरिकांना 24 तास मोफत शुद्ध पाणी देण्याचा निर्णय नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी घेतला आहे. सरपंच परदेशी यांनी गावकऱ्यांना दीपावलीपूर्वीच मोठे गिफ्ट दिल्याने गावकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.