नगर – केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका व खाजगी अनुदानित शाळेत विद्यार्थ्यांना दुपारी आहार शिजून देणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील स्वयंपाकी व मदतनीसांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
स्वयंपाकी व मदतनीस यांना दरमहा अडीच हजार रुपये मानधन आहे. त्याप्रमाणे त्यांचे वार्षिक उत्पन्न पंचवीस हजार असून दारिद्रय रेषेखालील असलेल्या उत्पन्नापेक्षा कमी आहे. त्यांची संख्या महाराष्ट्रात तीन ते साडेतीन लाख इतकी असून जिल्ह्यात सुमारे दहा हजार इतकी आहे.
स्वयंपाकी व मदतनीस यांना शासनाने तात्काळ दारिद्रयरेषेचे कार्ड देउन इतर योजनांचा लाभ द्यावा तसेच किमान वेतन दरमहा 15 हजार मानधन देण्यात यावे तसेच शाळेमध्ये स्वयंपाक करण्यासाठी लागणारे साहित्य भात शिजवायचे पातीले, झाकण्या, गॅस शेगडी, मिक्सर, कुकर आदी साहित्य देण्यात यावे, या मागण्यासाठी श्रमिक मजदूर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून निदर्शन करण्यात आले. यावेळी श्रमिक मजदूर संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सविता विधाते, महेंद्र विधाते, उत्तम गायकवाड, कावेरी साबळे, शहाराव लोहोकरे, राणी भोरे,छाया भुमकर, मनीषा कोतकर, ज्योती आव्हाड आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.