भाजप सोशल मीडियामध्ये अजित पवारांचा फोटो नाही
लोणी देवकर – राज्यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्त मध्ये सामील झाले. यामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रित सत्तेमध्ये सहभागी आहेत.
राज्य पातळीवर तिन्ही पक्षांचे नेते कार्यकर्ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे फोटो सोशल मीडियामध्ये देखील वापरत आहेत; परंतु याला इंदापूर अपवाद आहे. इंदापूरमध्ये सोशल मीडियामध्ये सक्रिय असलेल्या भाजपच्या अनेक पोस्टवर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नसल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
इंदापूरमध्ये पारंपरिक विरोधक असलेले भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते मात्र सूत जुळवून घेयला तयार नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. पूर्वी विकास निधीवरून एकमेकांवर टीका करणारे आता एकत्रित सत्तेत असल्याने निधी आम्ही आणला किंवा तिजोरीच्या चाव्या आमच्याकडेच आहेत अशा टीका टिपण्या झाल्या; मात्र इंदापूर मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात हे चित्रच स्पष्ट होईल असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सोशल मीडिया वर चाललेल्या फोटोंच्या राजकारणाची लवकरच इंदापूरकरंना याची प्रचिती येईल.