पिंपरी – पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो सुरू व्हावी. नागरिक सार्वजनिक वाहतुकीकडे वळावेत. सुलभ आणि सार्वजनिक जलद वाहतुकीतून या शहराचा विकास व्हावा, असे स्वप्न दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाहिले होते. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मंगळवारी (दि. 1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, अशा भावना भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केली.
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मंगळवारी (दि. 1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शंकर जगताप म्हणाले की, उद्घाटन झाल्यानंतर दुपारपासूनच पिंपरी-चिंचवड ते सिव्हील कोर्ट आणि डेक्कन जिमखाना ते रुबी हॉल या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली.
आता मेट्रोमुळे पुणे रेल्वे स्थानक येथून पिंपरी येथे येण्यासाठी अवघे 22 मिनिट लागणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर सकाळी सात ते रात्री दहा या कालावधीत दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. त्यामुळे पुणे ते पिंपरी हे अंतर अवघ्या 22 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. सध्या पुणे मेट्रोच्या सेवेत 18 मेट्रो रेल्वे दाखल झाल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड हे मेट्रो सिटी व्हावे, असे स्वप्न दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी दशकापूर्वी पहिले होते. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला देशाने स्वीकारले. त्यानंतर शहरानेही भाजपला कौल दिला. याचवेळी त्यांनी पिंपरी चिंचवड अधिक वेगवान व्हावे, यासाठी मेट्रोची संकल्पना मांडली होती. आज त्यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरली, याचा शहरातील प्रत्येक नागरिकाला मनस्वी आनंद वाटत असल्याचे शंकर जगताप यांनी सांगितले.