सविंदणे (शिरूर) – म्हसे (तालुका शिरूर) येथील महिलेवर बिबट्याने हल्ला केला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. तुळसाबाई गंगाराम मुसळे असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेत तुळसाबाई यांच्या पाठीवर, डोक्यात जखमा झाल्या आहेत. उपचारासाठी त्यांना शिरूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बेट परिसरातील जांबुत, पिंपरखेड या भागात बिबटयाच्या हल्ल्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. त्यानंतर आता म्हसे येथे बिबट्याने हल्ला केला. या घटनांमुळे नागरीक भितीच्या छायेखाली जीवन जगत आहे.
हल्ला झाल्यावरच पिंजरा लावला जात आहे. वनविभाग हलगर्जीपणा करत असून परीसरात जनजागृती करत नाही, असा तक्रारीचा सुर नागरीकांमधून उमटत आहे.
गेली दोन वर्षापासून या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. अनेकदा पशुधनासह चार जणांना आपला जीव गमवावा लागला असून बिबट्याच्या वाढत्या मुक्त संचारामुळे शेतमजुरांसह नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत पिंजऱ्यांची संख्या वाढवून बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.