बांदलवाडीत खोट्या रहिवाशांचा करार : बीडीओंना निवेदन
बारामती – बांदलवाडी (ता. बारामती) येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात आरटीईअंतर्गत देण्यात आलेली ऍडमिशन हे स्थानिक लोकांना प्राधान्य न देता बाहेर गावातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले आहे. ज्यांनी खोटी रहिवासी नोटरी करार करून घेतले आहेत. त्यांना ऍडमिशन दिली आहेत. याबाबत तक्रारीचे निवेदन पंचायत समिती गटविकास अधिकारी अनिल बागल व गट शिक्षण अधिकारी गावडे यांना देण्यात आले.
शासनामार्फत रहिवासी पुराव्यांची सकल चौकशी करून खोटे व बोगस भाडेकरार करून देणार व घेणार यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून खोट्या मार्गाने झालेले सर्व ऍडमिशन रद्द करून वेटिंग लिस्टमधील स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतोष वाईकर, किशोर शिंदे, किरण गंगावणे आदींसह ग्रामस्थांनी दिला.
निवेदनाची दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासनदरबारी संबंधित विभागाकडे मार्गस्थ करू, असे आश्वासन गटविकास अधिकारी अनिल बागल यांनी दिले.
गटविकास अधिकारी अनिल बागल यांना निवेदन देतेवेळी संतोष वाईकर, विजय शिंदे, सुनील बनसोडे, किरण गंगावणे, अनिल शिंदे, रमेश वायकर, अमोल वाईकर, दत्तात्रय शिंदे, सोमनाथ सुपलकर, श्रीकांत पवार, संतोष वाईकर, मधुकर शिंदे, प्रशांत गंगावणे, शंकर पिसाळ, राजेंद्र पिसाळ, तुकाराम वाईकर, ज्ञानेश्वर सुपलकर, पापाभाई पठाण, तुकाराम शिंदे, बापू कुदळे, सागर गंगावणे, सूरज सुपलकर, शरद कुदळे, गणेश कुदळे, अभिजीत वाईकर, विजय लाड उपस्थित होते.
दरम्यान, तक्रारदार पालकांनी याविरोधात आक्रमक पावित्रा घेतल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. याचे पडसाद प्रवेश प्रकियेच्या सुरूवातीलाच उमटले आहेत.
बोगस नोटरीचा करार
आरटीईअंतर्गत ऍडमिशनसाठी नोटरी करून देणाऱ्या मालकांनी हजार रुपये घेऊन खोटी बोगस रहिवासीबाबत नोटरी करार, प्रतिज्ञापत्र करून दिले आहे. शासनाची देखील फसवणूक करण्यात आली आहेत. ज्या लोकांनी भाडेकरार दाखवून आरटीई अंतर्गत ऍडमिशन घेतले आहेत. तो एकही विद्यार्थी स्थानिक रहिवाशी नाहीत. बांदलवाडी याठिकाणी भाडेतत्त्वावर देखील राहत नाही. त्यामुळे स्थानिक व गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. ते चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत, असा आरोप यावेळी केला.