अवसरी बुद्रुकला “मातंग एकता’चे ठिय्या आंदोलन
15 टक्के निधीबाबत माहिती मिळवण्यासाठी महिनाभर प्रयत्न
मंचर – अवसरी बुद्रुक येथे मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या 15 टक्के रकमेबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीला तोंडी व लेखी मागणी करूनदेखील माहिती उपलब्ध होत नव्हती. यासाठी संग्राम गायकवाड व विनोद राजगुरू यांच्या नेतृत्वाखाली आज (दि. 2) ग्रामपंचायतेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. 6 जुलैला दिलेल्या अर्जानुसार महिना उलटून गेला तरी माहिती उपलब्ध होत नव्हती. जी माहिती महिनाभर मागून मिळत नव्हती ती या आंदोलनामुळे तीन तासांत नागरिकांना माहिती उपलब्ध झाली.
अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे मातंग एकता आंदोलनाच्या वतीने ग्रामपंचायत मागासवर्गीय पंधरा टक्के निधीसंदर्भात केलेला खर्च आणि असलेली रक्कम याची माहिती अनेक वेळा तोंडी व लेखी अर्ज देऊनही वेळेवर माहिती देत नसल्याच्या निषेधार्थ अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर मंगळवारी (दि. 2) ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मागील अनेक वर्षांपासून अवसरी बुद्रुक येथील मातंग वस्ती येथे पथदिवे, सार्वजनिक शौचालयाचे दुरुस्ती व उपसा करणे, निकामी झालेली पाण्याची टाकी साफ करणे, सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीची दुरुस्ती, सभा मंडप, अंगणवाडीसाठी मदत व अण्णा भाऊ साठे प्रवेशद्वार करण्याबाबत माहिती मागितली होती. त्याचबरोबर मागील चार वर्षांत 15 टक्के मागासवर्गीय रक्कम खर्च यांचा हिशोब मागितला होता.
ही माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत सरपंच पवन हिले, ग्रामविकास अधिकारी मोहन गर्जे यांनी ग्रामपंचायत सदस्य आशा चव्हाण, अजित चव्हाण, स्वप्निल हिंगे, प्रशांत वाडेकर, सचिन हिंगे यांच्या उपस्थितीत सरपंच पवन हिले यांनी मागितलेल्या माहितीचा तपशील आंदोलनकर्त्यांना लेखी स्वरूपात दिला आणि उर्वरित कामे येत्या काही दिवसा.त करण्याचे आश्वासन दिले. यावेळेस वसंत गायकवाड, सचिन पंचरास, वैशाली गायकवाड, मंजूश्री गायकवाड, मोनिका गायकवाड, दिपाली राजगुरू, मनीषा पंचरास, नूतन गायकवाड, संध्या गायकवाड यांच्या अनेक नागरिक उपस्थित होते.
ग्रामपंचायतीला घरचा आहेर
अवसरी बुद्रुक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे अवसरी बुद्रुकचे उपाध्यक्ष संग्राम गायकवाड यांनी घरचा आहेर देऊन आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातून कामे होत नसल्याची तक्रार केली आहे.