बर्मिंगहॅम, दि. 2 -बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सायकल शर्यत भारताच्या मीनाक्षीसाठी धक्कादायक ठरली. स्पर्धेदरम्यान ती घसरून पडली व मागून येत असलेल्या स्पर्धकाची सायकल तिच्या अंगावरून गेली. यंदाच्या या स्पर्धेत गेल्या पाच दिवसात दोन अपघात घडले आहेत. दुसऱ्या अपघातात भारताचाच विश्वदीप सिंग हा सायकलपटूही जखमी झाला होता.
महिलांच्या 10 किलो मीटर स्केच रन स्पर्धेदरम्यान मीनाक्षीचा अपघात झाला. या अपघातात मीनाक्षी सायकलवरून घसरून ट्रॅकबाहेर पडली. त्याचवेळी मागून येत असलेल्या न्यूझीलंडच्या ब्रायोनी बोथा या सायकलपटूने आपला वेग कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यात तिला यश आले नाही व मनिाक्षीच्या अंगावरुन तीची सायकल गेली. यावेळी बोथादेखील सायकलवरून खाली पडली. ही घटना घडताच वैद्यकीय पथकाने त्यांना ट्रॅकबाहेर नेले व त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. या दोन्ही सायकलपटूंना स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले.
मूळची हरियाणाची असलेल्या मीनाक्षीने 2019 साली या खेळाला सुरुवाती केली. याचवर्षी झालेल्या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत तिने यशस्वी कामगिरी केली व त्यामुळेच तिची 2020 साली भारतीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली. त्याच वर्षी तिने आंतरराष्ट्रीय आशियाई ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवले होते.