नारायणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार आणि अजित पवार गट असे दोन दोन गट पडल्यानंतर जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र गुरुवारी (दि. 25) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौर्यात आमदार बेनके यांनी अजित पवार गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
सत्ता संघर्षानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहिल्यांदाच जुन्नर विधानसभेचा दौरा करत आहेत. आजपर्यंत तटस्थ राहिलेले आमदार अतुल बेनकेंनी हा दौरा आखला होता. यानिमित्ताने मतदारसंघात झळकलेल्या फ्लेक्सवर शरद पवार यांना स्थान नव्हते. दरम्यान, शरद पवार यांनी जुन्नरमध्ये शेतकरी मेळावा घेऊन दोन आठवडे ही उलटले नाहीत तर लगेच बेनके यांनी अजित पवारांच्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावरून बेनके आता अजित दादांच्या गटात सहभागी झाल्याचे संकेत मिळत आहेत. आजच्या शेतकरी मेळाव्यात बेनके यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे.
आमदार बेनके म्हणाले की, जुन्नर तालुक्यात पायभुत सुविधा उभे करण्याचे यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वल्लभ बेनके यांनी केले. त्यानंतर अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांनी केले. त्यामुळे आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर करत अजित पवारांचा झेंडा जुन्नरमध्ये डोलाने फडकवणार असल्याचे जाहीर केले.
कांदा उत्पादकांना…
शरद पवार अथवा अजित पवार यांनी बरोबर येण्यासाठी जबरदस्ती केली नाही. शरद पवार जसे शेतकर्यांचे नेते आहेत तसेच जुन्नर तालुक्यातील जनता अजित पवार यांच्याकडे शेतकर्यांचे नेते म्हणून बघत आहेत. मी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असून आमदार झाल्यापासून तालुक्यातील शेतकर्यांना पाणी कमी पडू दिले नाही. अजित पवार प्रश्न सोडवणारा व कामाचा माणूस आहे. कांदा निर्यातबंदी शेतकरी विरोधात निर्णय झाला. शेतकर्यांना धीर द्यायचे काम अजित पवार करीतल असा विश्वास अतुल बेनके यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवारांनी पर्याय उभा केल्यानेच?
राष्ट्रवादीत दोनगट पडल्यानंतर शरद पवार यांनी जुन्नर तालुक्याचे दोन दौरे केले. या दोन्ही दौर्यावेळी त्यांनी आमदार बेनके यांच्याकडे न जाता विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या घरी गेले होते. त्यामुळे पवारांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघात आमदार बेनके यांच्या विरोधात उमेदवाराचा पर्याय उभा करताच अतुल बेनकेंनी अजित पवार गटात जाण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या निर्णयानंतर शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अतुल बेनके यांची साथ मिळाल्याने जुन्नरमध्ये अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे. याचा फायदा अजित पवार गटाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.