जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा आदेश
बेल्हे – शिंदेवाडी (ता. जुन्नर) येथील रेशन दुकानातील गैरव्यवहार प्रकरणी गावातील नागरिक निलेश भागवत शिंदे यांनी तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. पुरवठा विभागाने तपास केला असता धान्याचा गैरव्यवहार झाल्याच उघड झाल्याने (दि.3)स्वस्त धान्य दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी दिला आहे.
तक्रारीच्या अनुषंगाने तालुका पुरवठा अधिकारी यांनी दुकानाची दि. 31 जानेवारी रोजी तपासणी केली. तपासणीमध्ये 5 हजार 960 किलो तांदूळ, 1782 किलो गहू कमी आढळला होता. चार किलो साखर जास्त आढळली होती. दुकानदार सर्व ग्राहकांना पावत्या देत नाही, अशी तक्रार होती. वरील दोषांच्या अनुषंगाने रेशन दुकानदार मारुती शंकर शिंदे, तक्रारदार निलेश भागवत शिंदे तसेच तालुका पुरवठा अधिकारी रवींद्र दळवी यांची दि. 11 एप्रिल 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यापुढे सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान कमी आढळलेल्या 5960 किलो तांदूळ, 1782 किलो गहू आणि चार किलो साखर जास्त आढळल्याबद्दल रेशन दुकानदाराने केलेला खुलासा योग्य आढळून आला नाही. घडलेला दोष हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आणि धान्याबाबत अपहार झाल्याचे दिसून आल्याने दोषास स्वस्त धान्य दुकानदाराला पूर्णपणे जबाबदार धरण्यात आले.
जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. होळकर यांनी स्वस्त धान्य दुकान परवानाधारक मारुती शिंदे यांच्याकडून तपासणीमध्ये कमी आढळून आलेला 1782 किलो गहू व 5960 किलो तांदूळ धान्याची चालू बाजारभावाप्रमाणे रक्कम शासन जमा करून घेण्याचा तसेच त्यांच्या स्वस्त धान्य दुकान परवान्याची 100 टक्के अनामत रक्कम जप्त करण्याचा आणि स्वस्त धान्य दुकान परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश दिला आहे.
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आणि रेशनचा सर्व कारभार ऑनलाइन होऊनही कशा पद्धतीने काळाबाजार करून गोरगरिबांना मिळणाऱ्या रेशन धान्याचा अपहार केला जातो हे उघड झाले आहे.परंतु अजूनही पाच टन धान्याचा आणि दहा हजार लिटर रॉकेलचा घोटाळा सिद्ध न झाल्याने आम्ही पुरवठा शाखा उपायुक्त, विभागीय कार्यालय, पुणे यांच्याकडे पुढील अपील दाखल करणार आहोत.
– प्रदीप पांडुरंग शिंदे/निलेश भागवत शिंदे, तक्रारदार