स्वतःची किडनी तिला दिली ; पण नियती कठोर ठरली
मंचर – मुलीच्या किडन्या फेल झाल्याने तिला जगवण्यासाठी बापाने प्रयत्नाची पराकाष्ठा केली. स्वतःची किडनी तिला दिली. तिच्या वैद्यकीय उपचारासाठी साठ लाख रुपये खर्च केले; परंतु नियतीच्या मनात वेगळेच असल्याने तिला मृत्यूने गाठले. करोनानंतर म्युकरमायकोसिसचे तिला इन्फेक्शन झाले आणि अवघ्या 38 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. ही दुर्दैवी घटना मंचर (ता. आंबेगाव) येथे घडली.
खडकी पिंपळगाव मूळचे असणारे भरत बांगर यांचे कुटुंब सध्या मंचर येथे राहत आहे. स्नेहा बांगर ही त्यांची मुलगी तिचे शिक्षण एम एस्सी बायोटेकमध्ये झाले होते. ती मुंबई येथे एका कंपनीत कामाला देखील होती. मात्र, ती अचानक आजारी पडली. बीपी वाढू लागल्याने तिची तपासणी केली, तेव्हा तिची किडनी निकामी होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
घराच्यांनी पिंपरी-चिंचवड येथील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू केले. काही दिवसांनी तिचे डायलेसिस सुरू झाले. मात्र, शरीर साथ देत नसल्याने किडन्या निकामी होऊ लागल्या. तिच्या यातना बापाला बघवल्या नाहीत. त्यांनी स्वतःची किडनी मुलीला दिली. किडनी बसविल्यानंतर तिने चांगला प्रतिसाद दिला. तिला कुठलेही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आरामासाठी मोशी येथे नातेवाइकांकडे ठेवले.
60 लाखांचा खर्च
सहा महिन्यानंतर तिला पुन्हा त्रास होऊ लागला. तिला रुग्णालयात दाखल केले. तिला म्युकरमायकोसिसचे इन्फेक्शन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे तिचे प्रत्येक आठवड्याला शरीरातील एक भाग निकामी झाल्याने काढावा लागत होता. या ऑपरेशनमुळे तिला प्रचंड अशक्तपणा आला. अखेर तिने जगाचा निरोप घेतला. बापाने तिच्या उपचारासाठी किडनी दिली, साठ लाख रुपये खर्च केले; पण नियती कठोर ठरली.