सेवानिवृत्त शिक्षकांना आमदार मोहिते पाटलांचे आश्वासन
कडूस – सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा आरोग्य भत्ता दरमहाचे निवृत्ती वेतन वेळेवर मिळणे, जुनी पेन्शन योजना, केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांच्या हक्काच्या प्रलंबित मागण्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्याबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आश्वासन दिले आहे.
खेड तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार मोहिते यांनी आश्वासन दिले. यावेळी जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष वसंत वाबळे, जिल्हा सरचिटणीस सुदाम भापकर, जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, ऑल इंडिया फेडरेशनचे उपाध्यक्ष एन. डी. मारणे, राष्ट्रपती पारितोषिक विजेते जि. रं. शिंदे, उपशिक्षणाधिकारी अशोक कडलक, ऍड. नानासाहेब लोंढे, बबनराव पावडे, मारूती राक्षे तसेच कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने सेवानिवृत्त शिक्षकांना सभासद करुन घ्यावे, त्यांना नियमाप्रमाणे कर्जाची पूर्तता व्हावी, असे आमदार दिलीप मोहिते यांनी नमूद केले. दत्तात्रय सावंत यांच्या प्रास्ताविकानंतर सचिव शांताराम मते यांनी अहवाल वाचन केले.
अध्यक्ष सुदाम वेहळे यांनी सभासदांच्या शंकांचे निरसन केले. देशभरात काही राज्यांमध्ये पेन्शनरांना मेडिकल भत्ता मिळतो. याप्रसंगी अमृतमहोत्सवी शिक्षकांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह तसेच 90 वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांना “जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.