शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एकाच गावात तब्बल चौदा दत्त मंदिरांवर दत्ता जयंतीच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे आयोजित पालखी सोहळ्यादरम्यान तब्बल चौदा दत्त मंदिरांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करीत अनोख्या पद्धतीने दत्त जयंती साजरी करण्यात आली आहे.
शिक्रापूर येथे श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे आयोजित पालखी सोहळ्या दरम्यान अनेक युवक, युवतींसह ज्येष्ठ नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला होता. दिंडोरी प्रणीत येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात आठवडाभरापासून अडीच हजारांचे वर सेवेकरी पारायणाला बसले होते. श्री दत्त महाराजांची पालखी सजवण्यात येऊन पारंपरिक वेशात महिला व सेवेकरी सहभागी झाले होते.
मारुती व दत्त मंदिरापासून सुरू झालेल्या पालखी सोहळ्यात महिला भगिनींनी मंगल कलश डोक्यावर घेत दत्त नामाचा जयघोष करीत फुगड्या व फेर धरुन दत्तजयंती साजरी केली. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, जिजामाता बँकेचे संचालक आबाराजे मांढरे, संजय भुजबळ, उद्योजक शैलेंद्र मांढरे, गंगाधर पठाडे,
दत्तात्रेय वाळवेकर, कल्याण फाटके, राजेंद्र शेवाळे, शरद वाघ, भास्कर पठाडे, शहाजी दरेकर आदींनी केले. यावेळी आयोजकांच्या वतीने श्री स्वामी समर्थ केंद्रातील दत्तमूर्ती तसेच ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, मारुती मंदिरांसह मलठण फाटा, गावठाण, बुधे वस्ती, क्षितिज विहार, बजरंगवाडी, महानुभव मंदिर, मांढरे वस्ती, एसटी स्टँड, पोलीस स्टेशन, ओरा सिटी, चासकमान कॉलनी येथील दत्त मंदिरांसह आदी मंदिरांवर प्रथमच हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.