जुन्या-नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार : नगर परिषद निवडणूक चुरशीची होणार
मतदारसंघावर भाजप करणार दावा
अपक्षांसह सत्ता प्रस्थापित केली होती
रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – राजगुरूनगर नगरपरिषदेची नगरसेवकांची संख्या तीनने वाढली असून सोमवारी (दि. 13) आरक्षण जाहीर झाले त्यामुळे लवकरच निवडणूक जाहीर होण्याची आशा आहे. त्यातच आरक्षण जाहीर झाल्याने यंदाच्या निवडणुकीत पॅनल उभे राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरक्षण सोडतीमुळे जुन्या नवीन चेहऱ्यांचा संधी मिळणार असल्याने निवडणूक मात्र चुरशीची होणार आहे.
नगरपरिषद 7 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. पंचवार्षिक मुदत संपुष्टात आली पण करोनामुळे दोन वर्षे निवडणूक प्रलंबित राहिली. प्रथम निवडणुकीत 9 अपक्ष उमेदवार निवडून आले होते. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 7 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेचे 2 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षीय चिन्हावर ही निवडणूक लढवली नव्हती. पहिल्या अडीच वर्षांत अपक्षांच्या माध्यमातून नगरसेवकांनी सत्ता प्रस्थापित केली होती. पुढच्या काळात मात्र भाजपचे वर्चस्व कायम राहिले. या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून येतील याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
भाजप-राष्ट्रवादीत होणार थेट लढत?
मागील अडीच वर्षे नगरपरिषदेत भाजपची सत्ता असल्याने जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढली जाणार असल्याने आगामी निवडणुकीत भाजप विरोधात राष्ट्रवादी असा थेट सामना पहायला मिळणार आहे. तर शिवसेना आणि कॉंग्रेस काय भूमिका घेणार? आघाडी होणार का? हे प्रत्यक्ष निवडणूक लागल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
नागरी प्रश्नांचे आव्हान
राजगुरूनगर शहरात गेली अनेक वर्षांपासून अशुद्ध पाणी पुरवठा व कचरा प्रश्नांसह इतर नागरिक प्रश्न नागरिकांना सतावत आहेत. मागील पंचवार्षिक काळात नगरपरिषदेच्या माध्यमातून चास कमान धरणातून पाणी योजना, शहरातील भुयारी, अंतर्गत रस्ते कामे मंजूर झाली व ती धीम्या गतीने आजही सुरू आहेत. पाणी योजना व गटार आदी कामासाठी खोदलेले रस्ते, रस्त्यावर झालेला राडारोडा, पाणी, वीजप्रश्न आदींबाबत नागरिकांची खूपच ससेहोलपट झाली. त्यामुळे या निवडणुकीत सर्वांपुढे मोठे आव्हान असणार आहे.
आमदार मोहिते लक्ष घालण्याचे संकेत
मागील पंचवार्षिक निवडणुकीत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी लक्ष घातले नव्हते, यावेळी मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत आहेत.