पुणे जिल्हा: निमगाव केतकी ओढ्यावरील अतिक्रमणे नेस्तनाबूत करा

उपमुख्यमंत्री पवार : पूरपरिस्थितीची केली पाहणी

रेडा  -निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील ओढ्यावर अतिक्रमण करून बांधकाम केल्याने पूराच्या पाण्याचा फटका शेकडो सर्वसामन्य नागरिकांना बसला आहे. त्यामुळे ओढ्यावरील अतिक्रमणधारकांना स्वखर्चाने अतिक्रमण काढायला लावा. अन्यथा तात्काळ शासनाच्या माध्यमातून ती अतिक्रमणे नेस्तनाबूत करा. कोणाला त्रास देण्याच्या उद्देशाने हा निर्णय नाही. तर गावातील 90 टक्‍के लोकांच्या हिताचा अतिक्रमण हटविण्याचा निर्णय ठरणार आहे. त्यामुळे कोण नाराज होतो हे पाहण्याची गरज नाही, अशीही तंबी अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्याच्या दौरा संपवून उपमुख्यमंत्री इंदापूर तालुक्‍याच्या हद्दीतून जात असताना निमगाव केतकी गावातील पूर परिस्थितीची त्यांनी थांबून पाहणी केली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बारामती विभागाचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ मोरे यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, कोणत्याही गावात ओढ्यावरील अतिक्रमणे होणे हे चुकीचे असून ते नियमबाह्य आहे. शासकीय कागदपत्रे घेऊन ओढ्याचे सर्वेक्षण करा. तहसीलदारांनी सरकारच्या ओढ्याच्या नोंदी काढाव्यात. पूर परिस्थिती झाली की, सरकारला पैसा खर्च करावा लागतो. हा खर्च आता अतिक्रमणे हटवली तर आगामी काळात वाचेल असाही सल्ला उपस्थित अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी दिला.

धनदांडग्यांची तंतरली : गावात व इतर ठिकाणी सत्ता चालवायची म्हणजे खुर्ची पाहिजे व या खुर्चीसाठी धनदांडग्यांना राजकारणी पाठिशी घालतात. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोखठोक असल्यामुळे, कित्येक वर्षांपासून निमगाव केतकी येथे ओढ्यावर झालेली धनदांडग्यांची अतिक्रमणे निघणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्‍त केले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.