मायक्रोफिल्म : डरो मत

माधुरी तळवलकर

काहीही झाले तरी घाबरायचे नाही, असा संदेश देणारी ही फिल्म प्रादेशिक वातावरणातील आहे. दाक्षिणात्य कुटुंबातील एक मुलगी रिक्षाने घरी येत असताना तिची आई तिला येताना सामोसे आणायला सांगते. तिथे सगळे पुरुष. गर्दी. ही दुकानादाराला सामोसे मागते. एक रस्त्यावरचे कुत्रे उगाचच तिच्याकडे बघून भुंकते आहे. थांबतच नाही. ही घाबरून जाते. कशीबशी सामोसे घेऊन रिक्षात बसते आणि घरी येते. घरी आल्यावर तिला कळते की, लग्नासाठी तिला भेटायला मुलाकडची मंडळी लवकरच येणार आहेत.

आई भराभरा तिचे आवरते. तिच्या दाट केसांमध्ये गजरेबिजरे घालते. सुंदर साडी नेसवते. ही बावरलेली. आई एकीकडे तिला सांगतेय, “मुलगा मुंबईत नोकरी करतो. तिथे त्यांचे घर आहे. सुशिक्षित मुलगा आहे.’
“मला ग्रॅज्युएट व्हायचे होते. आता परीक्षा आहे माझी.’ मुलगी कशीबशी म्हणते. पण आई त्या स्थळावर खूश आहे.

मंडळी येतात. पत्रिका जुळते. परस्परांना सारे पसंत पडते. मग मध्यमवर्गीय घरांमध्ये होते तसे इथेही मुलगा आणि मुलगी यांना बाहेरच्या बाजूला बाल्कनीत पाठवले जाते आणि दोघांना बोलायला मिळते. हिला परीक्षा द्यायचीय पण बोलायचे कसे? तेवढ्यात मुलगा म्हणतो, “आता परीक्षा आहे ना तुझी? नीट चांगली परीक्षा दे. लग्न ठरतेय म्हणून परीक्षा टाळू नकोस.’ ही खूश होते. गुरुजी सांगतात की,

आठवडाभरातच लग्नाचा मुहूर्त आहे. मग लवकरचा मुहूर्त नाही. त्यामुळे लगेचच हे लग्न होते. मुलगा काही कामासाठी बाहेर जायला निघतो. आई अडवते. काही धार्मिक काम सांगते. पण तो म्हणतो, माझे काम महत्त्वाचे आहे. मला ऑफिसला गेले पाहिजे. जाताना हिला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. अचानक बॉम्बस्फोटामध्ये काहीजणांचा मृत्यू झाल्याची बातमी येते.

आई घाबरते. सुनेला अवलक्षणी ठरवून टाकते. सूनही सैरभैर मनस्थितीत कुणाला न सांगता गुपचूप परीक्षेचे साहित्य घेऊन बाहेर पडते. अभ्यास झालेलाच असतो. भराभर पेपर लिहिते. ताबडतोब घरी येते. नवऱ्याची काळजी असतेच. पण त्याच्याच इच्छेसाठी ती हे दिव्य करते. घरी पोचताच नवऱ्याला सुरक्षित पाहून हिच्या जिवात जीव येतो. सासू तक्रार करते की, नवऱ्यापेक्षा स्वतःची परीक्षा हिला महत्त्वाची वाटते…’ आई गेल्यावर नवरा तिला थोपटत म्हणतो, “काहीही झाले तरी डरायचे नाही. पुढे जात रहायचे… ‘

परंपरा, समाज, इतरांची दूषणे… अनेक गोष्टींचे दडपण स्त्रीवर असते. या कशाचेही दडपण न बाळगता योग्य तेच करण्याची प्रेरणा या फिल्ममधून मिळते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.