गेल्या आठवड्यातील पावसामुळे नागरिकाचे हाल ः दूध संचालकांनी केली पाहणी
अवसरी – अवसरी बुद्रुक आणि परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील अनेक वाडी-वस्तीवरील रस्ते, नाले वाहून गेले आहेत, त्यामुळे नागरिकांना दूध, तरकरी, जनावरांचा चारा शेतातून बाहेर काढणे अवघड झाले आहे. या सर्व रस्त्यांच्या दुरवस्थेची पाहणी पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक विष्णूकाका हिंगे यांनी केली.
अवसरी बुद्रुक आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील रस्ते, नाले वाहून गेल्यामुळे दळणवळणावर परिणाम झाला आहे. पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक विष्णूकाका हिंगे, कारखान्याचे संचालक शांताराम बापू हिंगे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक हिंगे, माजी उपसरपंच सचिन हिंगे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर, वसंत हिंगे, भाऊसाहेब टाव्हरे, विकास हिंगे, भगीरथ जाधव, महेश गुणगे तसेच ग्रामस्थांनी घुली वस्ती, गुणगे शेटे मळा, घाटी मळा, आवठडावस्ती येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
या अतिवृष्टीमुळे गावातील इतर वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख विष्णूकाका हिंगे यांनी ग्रामपंचायत स्तरावर उपाययोजना करणे आणि आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांच्याशी झालेल्या नुकसानी संदर्भात मोबाइलवरून चर्चा केली, तसेच नुकसान रस्त्याची दुरवस्थेबद्दल माहिती दिली. प्रशासनाच्या वतीने आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून, आढावा घेऊन शासन स्तरावर होईल ती मदत करण्यात येईल असे तहसीलदार नाग टिळक यांनी सांगितले.
नुकसानभरपाई त्वरीत मिळावी
स्थानिक पदाधिकारी यांनी प्रशासनाशी लवकरात लवकर पाठपुरावा करून योग्य ती मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, रस्ते दुरुस्ती, नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई लवकर मिळावी तसेच फुटलेले नाले, बंधारे लवकरात लवकर दुरुस्त करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.