शिरसगाव काटा येथे नागरिक सहभागी : ग्रामदैवतांचे वाहन असल्याने पूजन
मांडवगण फराटा – लांबलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून, पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस पडावा, यासाठी शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी पावसासाठी ग्रामदैवताला साकडे घातले आहे.
शिरसगाव काटा येथील ग्रामदैवत श्री कोल्हाटी बुवा महाराज देवाचे वाहन गाढव असल्याने ज्यावेळी पाऊस पडत नाही. तेव्हा गाढवाची सवाद्य मिरवणूक काढत गाढवाची पूजा करून सोडले जाते व पाऊस पडतो, अशी गावची श्रद्धा आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस लांबल्याने ग्रामस्थांनी एकत्र येत शनिवारी देवाचे वाहन असलेल्या गाढवाची पूजा करीत मिरवणूक काढली. त्यानंतर ग्रामदैवत श्री कोल्हाटी बुवा महाराज यांची पूजा करीत देवाला “खूप पाऊस पडू दे’, असे साकडे घातले.
यावेळी घोडगंगा कारखान्याचे संचालक नरेंद्र माने यांनी सांगितले की, पाऊस लांबल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खूप पाऊस व्हावा, यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामदैवताची पूजा करीत साकडे घातले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दादासाहेब कोळपे, सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव, माजी सरपंच रामचंद्र केदारी, संजय शिंदे, सारंग जाधव, राजेंद्र लोंढे, सोसायटीचे माजी अध्यक्ष स्वप्निल काटे, माजी संचालक सुभाष गद्रे, मच्छिंद्र इंगळे उपस्थित होते.