2 लाख 97 हजारांना शेतकऱ्याला फसवले
मंचर – वृद्ध शेतकऱ्याच्या खोट्या सह्या घेऊन त्याच्या नावे सोसायटीत 2 लाख 97 हजार 500 रुपये कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी लोणी (ता. आंबेगाव) येथील सोसायटीच्या सचिवासह भावकीतील सहा जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोपट दत्तात्रय सिनलकर यांनी फिर्याद दिली आहे.
रानमळा येथील पोपट सिनलकर यांना भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटी, लोणी येथे त्यांचे वडील दत्तात्रय सिनलकर यांच्या नावावर 2 लाख 97 हजार 500 रुपयांचा कर्जाचा बोजा दिसला. याबाबत त्यांनी वडिलांना विचारले असता त्यांनी मी कोणतेही कर्ज घेतले नसून कोणाचाही जामीन नसल्याचे सांगितले. यावेळी पोपट सिनलकर यांनी सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाऊन सचिव निवृत्ती सिनलकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.
पोपट सिनलकर व त्यांचे कुटुंबियांनी याबाबत अधिक माहिती घेतली. 2021 मध्ये त्यांचा चुलत भाऊ दिनकर सिनलकर यास ट्रॅक्टर घ्यायचा होता. दिनकर यांच्या वडिलांच्या नावावर ट्रॅक्टरच्या किमती एवढी जमीन नसल्यामुळे दिनकर सिनलकर, पुतण्या सुधीर सिनलकर, विशाल सिनलकर यांनी पोपट सिनलकर यांच्या वडिलांच्या वयाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या खोट्या सह्या घेऊन वडिलाचे नावे सोसायटीत कर्ज घेतल्या समजले. याबाबत पोपट सिनलकर यांनी कर्जाबाबत विचारणा केली असता त्यांनी सोसायटीत न जाण्याबाबत धमकी देण्यात आली.
याबाबत दिनकर, विशाल व सुधीर यांनी ट्रॅक्टर घ्यायचा असून, ना हरकतसाठी साह्या पाहिजे, असे सांगून दोन वर्षांपूर्वी दोन कागदावर सह्या घेतल्याचे यावेळी दत्तात्रय सिनलकर यांनी सांगितले. याबाबत सीताराम सहादू सिनलकर, पांडुरंग सीताराम सिनलकर, दिनकर सीताराम सिनलकर, विशाल दिनकर सिनलकर, सुधीर सिनलकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.