लोणी काळभोर, हडपसर व यवत या तीन पोलीस ठाण्यांच्या ‘हद्द’ वाद
उरुळी कांचन – जावजीबुवाचीवाडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील होलेवस्ती प्राथमिक शाळेत आत्महत्या केलेल्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील अरविंद देवकर या शिक्षकाचे शवविच्छेदन तब्बल आठ तासानंतर झाल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. लोणी काळभोर, हडपसर व यवत या तीन पोलीस ठाण्यांच्या ‘हद्द’ वादामुळे देवकर यांचे शवविच्छेदन रखडल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
जावजीबुवाचीवाडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील होलेवस्ती प्राथमिक शाळेतील दहापैकी नऊ विद्यार्थ्यांनी जवळच्याच दुसऱ्या बहुशिक्षकी शाळेत प्रवेश घेतल्याच्या कारणावरुन त्या शाळेतील शिक्षक अरविंद ज्ञानेश्वर देवकर (वय 46, रा. निसर्ग सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली, मूळ – मावडी पिंपरी ता. पुरंदर) यांनी सहा दिवसांपूर्वी शाळेतच विषारी तणनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांचा उपचारादरम्यान मंगळवारी (दि. 8) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.
मृत्यू सकाळी आठच्या सुमारास झाला असला तरी, शवविच्छेदन मात्र सायंकाळी सातनंतर झाले. अरविंद देवकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन व्हावे व लवकर अंत्यसंस्कार व्हावेत. यासाठी देवकर यांचे नातेवाईक हडपसर पोलीस ठाण्यात आले. तेव्हा हडपसर पोलिसांनी सीमावादामुळे तुम्ही लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क करा, असे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून एमएलसीसंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी लोणी काळभोर पोलिसांना एमएलसी कळविली आहे, अशी माहिती मिळाली.
कर्मचारी आल्यानंतर पाठवून देतो
हडपसर पोलिसांच्या सूचनेनुसार, देवकर यांच्या नातेवाईकांनी लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनीही हात वर केले आणि आत्महत्येचा प्रयत्न जावजीबुवाचीवाडी (ता. दौंड) येथे झाल्याने त्यांनी नातेवाईकांना यवत पोलिसांशी संपर्क करा असे सांगितले. यावर देवकर यांच्या नातेवाईकांनी यवत पोलिसांशी संपर्क केला तेव्हा त्यांनी ‘कर्मचारी कामानिमित्त बाहेर गेले आहेत. आल्यानंतर पाठवून देतो’, असं उत्तर देत फोन ठेवला. हडपसर, लोणी काळभोर व यवत पोलिसांशी संपर्क करुनही पोलिस येत नसल्याचे पाहून, देवकर यांच्या नातेवाईकांनी आपल्या ओळखीच्या राजकीय पदाधिकाऱ्यांमार्फत मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
राजकीय पदाधिकाऱ्यालाही दाद नाही
रदेवकर यांच्या नातेवाईकांनी एका राजकीय पदाधिकाऱ्यांमार्फत लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता त्यांनी उरुळी कांचन चौकीच्या अंतर्गत येत असल्याने तेथील पोलीस कर्मचारी पाठवून देतो, असे सांगितले. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मात्र हडपसर व लोणी काळभोर या दोन्ही पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. लोणी काळभोर पोलिसांनी कार्यवाही करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. त्यामुळे अरविंद देवकर यांच्या पार्थिवावर दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. 9) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मूळ गावी मावडी पिंपरी (ता. पुरंदर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.