घोडेगाव न्यायालयाने सुनावली शिक्षा : वनक्षेत्रात पाणी टाकण्याचे आदेश
घोडेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत वणवा पेटवणे, मोराच्या शिकारीचे प्रकरण
मंचर – घोडेगाव (ता. आंबेगाव) वनपरिक्षेत्रांतर्गत दोन वेगवेगळ्या वनगुन्हे प्रकरणी घोडेगाव न्यायालयाने आरोपीस विहित वन कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षा म्हणून दंडात्मक कारवाईबरोबरच एक सामाजिक भान म्हणून वेगळीच शिक्षा सुनावली आहे. वन्यप्राण्यांसाठी स्वखर्चाने वनक्षेत्रात पाणवठे तयार करण्याची आणि त्याय नियमित पाणी टाकण्याची शिक्षा घोडेगाव फौजदारी व दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. ए. मुळीक यांनी सुनावली आहे.
घोडेगाव वनपरिमंडळ हद्दीत वणवा पेटविल्याबद्दल कोटमदरा येथील आरोपी दत्तात्रय मूऱ्होजी कोकणे याला गुह्याबद्दल दोन पानवठे स्वखर्चने तयार करून पाणी टाकणे आणि शिनोली परिमंडळ क्षेत्रात मोराची शिकार केल्याप्रकरणी आरोपी विजय सुनील गभाले यास वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार 10 हजार रुपये दंड आणि 2 पाणवठे तयार करणे व पाणी टाकणे अशी शिक्षा सुनावली आहे.
याबाबत वनविभाग जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते व सहाय्यक वनसंरक्षक एस.बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे, शिनोलीचे वनपाल जी. डी. इथापे, घोडेगावचे वनपाल टी. एन. कदम व संबधित वनरक्षक यांनी तपासकामी अवयश्यक ती कार्यवाही करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. घोडेगाव न्यायालयाकडून सुनावण्यात आलेल्या अशा प्रकारच्या शिक्षेमुळे एक वेगळा संदेश व त्याचबरोबर एक विशेष बाब म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि गुन्हेगारांना गुन्ह्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने घोडेगाव न्यायालयाने सुनावलेली शिक्षा ही न्यायिक व्यवस्थेतील महत्त्वाची शिक्षा ठरणार आहे.
आरोपींकडून आदेशाचे पालन
न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी संबंधित आरोपींनी केली असून उगलेवाडी येथील गभाले आरोपीने दोन पाणवठे, तसेच कोकणे आरोपीने ढाकाळे येथे दोन पाणवठे तयार केले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे यांनी दिली.