आवश्यक मेगा ब्लॉकला मिळाली परवानगी : आमदार राहुल कुल
दौंड – दौंड शहारातील तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या रेल्वेच्या मेगा ब्लॉकला रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळाली असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली.
मागील दहा दिवसांपूर्वी रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत रेल्वेच्या अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. यामधे दौंड शहारातील तिसऱ्या कुरकुंभ मोरीचे काम बंद आहे. याबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी हे काम तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.
याबाबात आमदार राहुल कुल हे आढावा घेतील असेही सांगितले होते. त्याप्रमाणे तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामासाठी रेल्वेच्या मेगा ब्लॉकची परवानगी आवश्यक होती. त्यानुसार आमदार कुल यांनी याबाबत सोलापूर डीआरएम गुप्ता यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार रेल्वेने तिसऱ्या मोरीच्या कामासाठी मेगा ब्लॉक जाहीर केला असल्याची माहिती आमदार कुल यांना सोलापूर डीआरएम गुप्ता यांनी दिली. त्यामुळे तिसऱ्या कुरकुंभ मोरीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
दौंड शहराची मुख्य बाजारपेठ व गावठाणाला जोडण्याकरिता आणि वाहतूककोंडी टाळण्याकरिता पूर्वीच्या दोन कुरकुंभ मोरी शेजारील प्रस्तावित तिसरी कुरकुंभ मोरी केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने 16 कोटी 50 लाख रुपये प्रकल्प खर्च असलेल्या या प्रकल्पास 1 ऑगस्ट 2013 रोजी मंजुरी दिली. प्रस्तावित तिसरी कुरकुंभ मोरी ही 24.60 फूट रुंद व 12.79 फूट उंच अशी आहे. कॉंक्रिटचे तयार बॉक्स लोहमार्गाखालुन पुशिंग करून हा भुयारी मार्ग केला जाणार आहे. रेल्वेच्या मेगा ब्लॉकला मंजुरी मिळाल्याने रखडलेले काम लवकरच मार्गी लागले असल्याचे ही कुल यांनी सांगितले.
इतरही मागण्यांबाबत रेल्वे राज्यमंत्री सकारात्मक
दौंड ते लोणावळा लोकल, पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाइन जोडणीच्या डिपॉझिट वर्क कामास परवानगी, दौंड – पुणे दरम्यान धावणाऱ्या मेमू लोकलचे दर पूर्वीप्रमाणे 20 रूपये करावेत, पुणे-हैद्राबाद-पुणे (सुपर फास्ट), मुंबई-चेन्नई-मुंबई सुपरफास्ट, एलटीटी-विशाखा पट्टणम सुपर फास्ट आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना दौंड स्थानकात थांबा द्यावा, वाढती लोकसंख्या व नागरीकिकरण लक्षात घेता पुणे – दौंड रेल्वे ट्रॅकचे चौपदरीकरण करावे व यवत आणि उरुळी कांचनमध्ये सहजपुर, उरुळी आणि लोणीकाळभोरमध्ये नायगाव, मांजरी आणि हडपसरमध्ये अमनोरा आदी नवीन स्थानकांची निर्मिती करावी, आदी मागण्याबाबत देखील राज्यमंत्री रावसाहेब दानवे सकारात्मक असल्याचेही आमदार कुल यांनी यावेळी सांगितले.