तळेगांव ढमढेरे – “भारतीय संविधान हा आपल्या राष्ट्राचा आत्मा असून सर्व भारतीय नागरिकांच्या सर्वांगीण प्रगतीचे एक प्रभावी माध्यम आहे, ” असे प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन निवृत्ती गवारी यांनी केले. विठ्ठलवाडी (ता शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर प्रशालेत संविधान दिन साजरा झाला. त्यावेळी ते बोलत होते.
निवृत्त कॅप्टन लोभाजी आल्हाट म्हणाले की, समाजातील साक्षर वर्गाने संविधान साक्षर होणे ही काळाची गरज आहे. युवकांनी संविधानाचा अभ्यास करून आत्मविश्वासपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा भारत घडवावा.
यावेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, प्रा. संदीप गवारी, विशाल कुंभार यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यातील शहीद जवान व मृत्यमुखी पडलेलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धाजली अर्पण करण्यात आली. माजी सरपंच आणि भारतीय लष्करातील निवृत्त कॅप्टन लोभाजी आल्हाट हे गेली पाच वर्षांपासून मोफत संविधान वितरणाचे कार्य करत आहेत. यावेळी महादेव गवारी, माजी उपसरपंच दिलीप गवारी, अंकुश गवारी, प्रा. संदीप गवारी, प्रा. अमोल सोनवणे, डॉ. प्रतीक्षा गवारी, गणेश गवारी, संदीप गवारी, विवेक गवारी, अनुजा गवारी आदी २२ युवक – युवतींनी संविधान प्रतिचे वितरण केले.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन निवृत्ती गवारी, निवृत्त कॅप्टन लोभाजी आल्हाट सहकारी दूध संस्थेचे माजी चेअरमन भाऊ वाळके, मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, प्रभाकर चांदगुडे, अरुण शिंदे, बाळासाहेब गायकवाड, विशाल कुंभार, विठ्ठल गवारी, प्रकाश राऊत उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळासाहेब गायकवाड यांनी केले. प्रभाकर चांदगुडे यांनी आभार मानले.