कोरेगाव भीमा/शिक्रापूर (वार्ताहर)- एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे होणारा विजय रणस्तंभ अभिवादन कार्यक्रम घरूनच साजरा करावा, असे आवाहन कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी केले आहे.
कोरेगाव भीमा येथे दरवर्षी एक जानेवारी रोजी शौर्यदिनानिमित्त महाराष्ट्रासह बाहेरील राज्यांतून लाखो भीम अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येतात, मात्र सध्याची करोना परिस्थिती पाहता शासनाच्यावतीने सर्वच सन उत्सव व कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
सर्वच कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरुपात साजरे करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे एक जानेवारी 2021 रोजी कोरेगाव भीमा येथे साजरा करण्यात येणारा शौर्यदिन कार्यक्रम जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, कोरेगाव भीमा विजयस्तंभ समितीच्या माध्यमातून प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. नागपूर, मुंबई या ठिकाणी दीक्षाभूमी, चैत्यभूमी ठिकाणी ज्या पद्धतीने प्रशासनाला सहकार्य करत सर्व कार्यक्रम व उत्सव साजरे करण्यात आले, त्याचप्रमाणे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे करावे. पुणे जिल्ह्यामध्ये तीन लाखांहून अधिक रुग्ण करोनाबाधित झाले आहेत.
सात हजार रुग्ण मयत झाले तर सध्या सतरा हजार रुग्ण करोनाबाधित आहेत. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. एक जानेवारी रोजी होणारा कार्यक्रम नागरिकांना घरी बसून ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरूनच अभिवादन करावे. तशी सुविधा प्रशासनाने केल्याचे वाघमारे यांनी सांगितले.