भुजंगराव दाभाडे
भोर – नेरे (ता. भोर) येथे जिल्हा परिषदेने 3 कोटी रूपये खर्च करुन उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार आरोग्य कर्मचाऱ्यांअभावी “रामभरोसे’ सुरू आहे. ऐन महामारीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेरे पंचक्रोशीतील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राला भोर तालुका पंचायत समितीकडून दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यातील एक वैद्यकीय अधिकारी विप्रो पुणे येथे कार्यरत आहेत. सध्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा संपूर्ण कारभार वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद जाधव व परिचारिका सांभाळत आहेत. मात्र, वैद्यकीय अधिकारी अत्यावश्यक सेवेविना प्राथमिक आरोग्य केंद्राकडे फिरकत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
शनिवारी (दि.26) रात्री एका शेतकऱ्यास सर्पदंश झाला होता. त्यावेळी त्याला वैद्यकीय अधिकारी उपस्थितच नसल्याने उपचार मिळाले नाहीत. तर एका गर्भवती महिलेचीही प्रसूतीबाबत अशीच स्थिती झाली. श्वानदंश झालेल्या रुग्णालाही लस मिळू शकली नाही. अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते अनिल सावले यांनी केली आहे.
भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे हे करोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे डॉ. जयदीप कपासिकर यांच्याकडे तालुका वैद्यकीय पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. मात्र. सहा दिवसांत तेही करोनाबाधित झाले आहेत. आता तालुका आरोग्याधिकारी पदाचा पदभार डॉ. संजय भारती यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तरी तेही गेल्या चार दिवसांपासून उपलब्धच होत नसल्याचे बोंगे यांनी सांगितले.
नेरे आरोग्य केंद्रातील डॉ. जाधव यांच्याविषयी नागरिकांच्या तक्रारी आहेत. करोना संकटकाळात आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते पुढे येऊन आरोग्य सेवा देत असताना वैद्यकीय अधिकारी करतात काय? याबाबत लागलीच नेरे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करणार आहे.
– कुलदीप बोंगे, प्रभारी गटविकास अधिकारी, भोर.
आरोग्य केंद्र नव्हे, विश्रामगृहच
नेरे प्राथमिक आरोग्य केंद्र हे उपचार केंद्र राहिले नसून याला विश्रामगृहाचे स्वरुप आले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिल सावले यांनी केला आहे. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांचे पाहुणे पर्यटनासाठी येतात. येथेच निवास करतात. आरोग्य केंद्राचा कारभार दोन दिवसांत सुधारला नाही तर येत्या दोन दिवसांत प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा अनिल सावले यांनी दिला आहे.