आमदार थोपटे : भोर मधील कृषी प्रदर्शनात अधिका-यांना सूचना
भोर – कृषीविषयक योजना कृषी अधिका-यांनी सर्वसामान्य शेतक-यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, त्यासाठी अधिका-यांनी लक्ष घालून या योजना जास्तीत जास्त शेतक-यांना समजावून सांगून त्याचा फायदा त्यांना करून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भोर-वेल्हे-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी केले. यावेळी शासनाच्या कृषी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत केली.
भोर तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या अनंत-निर्मल शेतकरी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिलाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना आमदार संग्राम थोपटे बोलत होते. भोर पोलीस ठाण्याच्या मैदानावर रविवारी (दि. १७) सुरू झालेले हे कृषी प्रदर्शन पाच दिवसांचे आहे.
यावेळी प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी, राजगड ज्ञानपीठाच्या सचिव स्वरूपा थोपटे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, उपविभागीय कृषी अधिकारी एस. एस. मडके, जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, महिलाध्यक्षा गीतांजली शेटे,
माजी सभापती लहू शेलार, वारकरी संघटनेचे अध्यक्ष तथा भोर ता. पं. स.चे माजी सभापती आर. के. रांजणे, धनंजय वाडकर, गीता आंबवले, कृष्णाजी शिनगारे, बाजार समितीचे अध्यक्ष आनंदराव आंबवले आदी प्रमुख मान्यवरांसह शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. भोर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे व उपाध्यक्ष अतुल शेडगे यांसह सर्व संचालकांनी या कृषी प्रदर्शनाचे नियोजन केलेले आहे.