पवित्र शिवलिंगाचे दाट धुक्यात लाखोंनी घेतले दर्शन
अवसरी – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे चौथ्या श्रारणी सोमवारी दीड लाख भाविकांनी हर हर महादेव, भोलेबाबा की जय… या जयघोषात, पाऊस व दाट धुक्यामध्ये पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले.
श्रावणातील चौथ्या सोमवारी आणि शनिवार, रविवार या दिवशी भीमाशंकरला सुमारे पाच लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे. या दोन दिवसांत संपूर्ण रात्रभर वाहनांची मोठी गर्दी होती, त्यामुळे वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. दर्शनबारीची रांग मंदिरापासून दीड किलोमीटर एमटीटीसी वाहनतफापर्यंत गेली होती.
भाविकांना दर्शन घेण्यासाठी सुमारे पाच ते सहा तास वेळ लागत होता. याचबरोबर भीमाशंकर येथे श्रावण सोमवारी मोठ्या प्रमाणावर अभिषेक होत असल्याने गर्दी वाढली होती. सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस उपनिरीक्षक सतीश डौले, किशोर वागज, अनिल चव्हाण,परिवहन मंडळाचे वाहतूक नियंत्रक तुकाराम पवळे, मारुती खळदकर पीएमपीएलचे अधिकारी बढेकर हे यात्रेचे नियोजन करत होते.
निसर्गसौंदर्याचा लुटला आनंद
भीमाशंकर परिसरामध्ये दाट धुके, बोचरी थंडी आणि मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सौंदर्य फुलले आहे. यामुळे भीमाशंकरला येणारे भाविक आणि पर्यटक हे सातमाळी घाट, तसेच ठिकठिकाणी थांबुन निसर्गाचा आनंद लुटत होते.
खड्ड्यांचा प्रवाशांना त्रास
भाविकांना बसस्थानकापर्यंत जा-ये करण्यासाठी एसटी च्या 19 मिनीबस व 17 मोठ्या बस व पी एम पी एल च्या 12 बसेस ठेवण्यात आल्या होत्या. शिवाजीनगर (पुणे) येथून दर आर्ध्या तासाला जादा गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे भाविकांना खड्ड्यांतूनच प्रवास करवा लागला. एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराचाही मोठा त्रास सहन करावा लागला, यामुळे येथे आलेल्या भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.