सेल्फी काढताना घडलेली घटना; “एनडीआयएफ’च्या जवानांनी घेतला शोध
पुणे – डेक्कन येथील भिडे पुलाजवळच्या मुठानदीपात्रामध्ये सेल्फी काढताना बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह रविवारी सकाळी आठ वाजता सापडले. महापालिका पूल व संगम पूल अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एनडीआरएफ) जवानांना मृतदेह सापडले. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली होती. मागील दोन दिवस नातेवाईक मृतदेह सापडतील, या आशेने नदी पात्राजवळ बसून होते.
ओंकार तुपधर (वय 18) व सौरभ कांबळे (वय 20, दोघेही रा. ताडीवाला रोड, पुणे स्टेशन) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. शहर व खडकवासला धरण साखळी परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू झाल्याने मुठा नदीमध्ये काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली होती.
शहरामध्ये कपडे खरेदी करून झाल्यानंतर ओंकार, सौरभ व चेतन असे तिघे मित्र भिडे पूल ते ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या नदीत सोडलेले पाणी पाहण्यासाठी थांबले होते. त्यावेळी ओंकार व सौरभ कपडे काढून सेल्फी काढण्यासाठी पाण्यात उतरले. त्यावेळी ओंकारचा पाय घसरून तो पाण्यात पडला. तेव्हा सौरभ त्याला वाचविण्यासाठी गेला. त्यानंतर दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध घेतला. मात्र ते आढळून आले नाहीत.
दरम्यान, दोन्ही तरुणांचा शोध घेण्यासाठी “एनडीआरएफ’ला पाचारण करण्यात आले. शनिवारी दिवसभर व रविवारी सकाळी “एनडीआरएफ’च्या जवानांकडून तरुणांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, रविवारी नदीतील पाणी कमी झाले. त्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून जवानांनी पुन्हा शोध सुरू केला. त्यावेळी महापालिकेजवळील पुलाखालील एका तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. तर दुसरा तरुणाचा मृतदेह संगम पुलाजवळ सापडला. “एनडीआरएफ’ जवानांची एक तुकडी आणि कसबा अग्निशमन केंद्राचे 21 जवान या शोधमोहिमेत सहभागी झाल्याचे अग्निशमन अधिकारी सुनील नाईकनवरे यांनी सांगितले.