इडीची कारवाई : बारामतीमधील दोन उद्योजकांचा समावेश
बारामती – बारामती अॅग्रोच्या महाराष्ट्रातील विविध कार्यालयावर शुक्रवार (दि.५) सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने छापेमारी केली. यावेळी बारामती शहरातील आणखी दोन उद्योजकांवर ईडीने छापेमारी केली आहे. या ठिकाणी दोघांची चौकशी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडी सक्रिय झाली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात विरोधकांकडून सातत्याने रोहित पवार यांच्या कारखान्याची चौकशी होणार, असे सांगितले जात होते. ही कारवाई ईडीने खरी ठरवली आहे. सकाळी आठपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. दरम्यान, बारामती ग्रुपच्या मुंबई व पुणे आणि बारामतीसह सहा ठिकाणांच्या कार्यालयांवर ही छापेमारी केली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कन्नड सहकारी साखर कारखान्याबाबत ईडीकडे तक्रार केली होती. त्यावर तत्परतेने ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे. कारखाना लिलाव प्रक्रियेत मॅन्युप्युलेशन झाल्याचा आरोप करीत सोमय्यांनी रोहित पवारांना टार्गेट केले होते. केंद्रीय यंत्रणेने छापे मारले आणि सोमय्यांचे म्हणणे खरे ठरले आहे.
दरम्यान, बारामती शहरात बारामती ऍग्रोच्या कार्यालयाखेरीज राजेंद्र इंगवले व संजय आवटे या दोघांचीही चौकशी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.