मंचर – पेठ (ता. आंबेगाव) येथील वाकेश्वर विद्यालयात झालेल्या आंबेगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लाल बहादूर शास्त्री विद्यालय अमोंडी विद्यालयाने नववी ते बारावी (आदिवासी) गटात प्रथम क्रमांक संपादन केला. विद्यालयाने सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक संपादन करून विज्ञान प्रदर्शनात हॅट्रिक पूर्ण केल्याची माहिती मुख्याध्यापक लक्ष्मण काळे यांनी दिली.
पेठ येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यालयातील आदेश गणेश फलके (नववी) या विद्यार्थ्याने तयार केलेल्या पशु-पक्ष्यांपासून पीक संरक्षण या उपकरणास प्रथम क्रमांक संपादन केला. शेतकऱ्यांचे पशु-पक्षापासून होणारी पिकांची नासाडी या उपकरणाने टाळता येईल.
हे उपकरण टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ केल्याने समाजातील सर्वसामान्य व गरीब शेतकऱ्यांना उपयुक्त ठरले आहे. त्याला विज्ञान शिक्षिका मोहिनी नाईक व प्रयोगशाळा परिचर संजय फलके यांनी मार्गदर्शन केले. यापूर्वी सन 2021-22 मध्ये वाऱ्यापासून वीज निर्मिती आणि 2022-23 मध्ये टू-इन-वन या उपकरणांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदविला.