लोणीकंद पोलिसांची कारवाई
समलैंगिक प्रेमप्रकरणातून केला होता खून
वाघोली – समलैंगिक प्रेमप्रकरणातून वाघोली येथील बकोरी रोड परिसरात महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने वार करून फरार झालेल्या मारेकऱ्यास लोणीकंद पोलिसांनी शिताफीने अटक केली. खून करून चेन्नईला फरार झालेल्या मारेकऱ्यास चेन्नईहून परतल्यानंतर दौंड येथील टोल नाक्याहून ताब्यात घेतले.
सागर अशोक गायकवाड (वय ३२, रा. पारगाव, दौंड), असे अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे. वाघोलीतील बकोरी रोड परिसरात (दि.२८) दुपारी समलैंगिक प्रेमप्रकरणातून तरुण महेश डोके (वय २१) यांच्यावर कोयत्याने वार केले होते. एका नागरिकाच्या सतर्कतेने हल्लेखोर सागर गायकवाड हा त्याठीकाणाहून फरार झाला होता. डोके यास ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी गायकवाड याच्या शोधासाठी तपास पथके रवाना केली होती.
कोयत्याने वार करून गायकवाड हा दुचाकीवरून केडगाव व त्याच्या पारगाव येथील घरी गेला होता. त्याने यवत येथून नातेवाईकाकडून पैसे घेऊन मिळेल त्या रेल्वेत बसण्यासाठी गेला. तो चेन्नईच्या रेल्वेमध्ये बसून फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्याशी संबंधित सर्व माहिती घेऊन तांत्रिक कौशल्याद्वारे तपास सुरु ठेवला होता. गायकवाड हा चेन्नईहून पुन्हा पुण्यात आल्यानंतर दौंड टोल नाक्यावर लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकाने त्यास ताब्यात घेतले. तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
फिर्यादीच्या मदतीचे कौतुक
महेश डोके याच्या पाठीमागे सागर गायकवाड कोयता घेऊन पळत असताना तेथील नागरिक कृष्णकांत यादव यांनी पाहिल्यानंतर ते जोरात ओरडून मदतीसाठी खाली मैदानात आले. त्यावेळी गायकवाड हा दुचाकीवरून फरार झाला तरी रक्तबंबाळ झालेल्या डोके यास त्यांनी स्वतःचा टी शर्ट काढून रक्तस्त्राव थांबविण्याच्या प्रयत्न केला. त्याच अवस्थेत पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावून जखमीस एका रिक्षाचालकाच्या मदतीने वाघोलीतील लाईफ लाईन हॉस्पिटलला नेले. हॉस्पिटलला नेताना जखमी डोके हा डोळे झाक करीत असताना देखील यादव यांनी त्याच्याशी धाडसाने बोलून नाव, हल्लेखोराचे नाव व हल्ल्याचे कारण विचारून घेतले. यादव यांनी या परिस्थितीतही लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाची फिर्याद दिली. अवघ्या सात दिवसांवर कृष्णकांत यादव यांचे लग्न आलेले असताना सुद्धा माणुसकीच्या नात्याने त्यांनी बघ्याची भूमिका न बजावता जखमी डोके याच्यासाठी केलेली मदत पोलिसांना फायदेशीर ठरली. यादव यांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक लोणीकंद पोलिसांनी केले आहे.