वाघोली – कुटुंबांसोबत सततची होणारी भांडणे व दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाल्याने बापानेच आपल्या 15 वर्षीय मुलीवर घरात ऊस तोडण्याच्या धारधार कोयत्याने सपासाप वार करून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास वाघोलीतील सरकारी दवाखान्याच्या मागे घडली.
जखमी अवस्थेततील मुलीला ससून रुग्णालयात पाठविण्यात आले असले तरी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलीवर झालेल्या जीवेघेण्या हल्ल्यानंतर वाघोली परिसरात खळबळ उडाली. अक्षदा फकिरा दुपारगुडे (सध्या रा. वाघोली, मूळ रा. सोलापूर) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे.
घरात बाप व मुलगीच होते. तर आई कामासाठी बाहेर गेली होती. दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाल्याने बापाने तिच्या डोक्यावर, हातावर व पायावर वार कोयत्याने केले.
वार करून फरार झालेल्या फकीरा गुंडा दुपारगुडे याला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी हडपसर येथून ताब्यात घेतले. या प्रकरणी फकिरा दुपारगुडे याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.