पुणे – हॉटेलमध्ये कुल्फीवरुन झालेल्या वादात मांजरीच्या माजी सरपंचावर गोळीबार करुन वीटेने मारहाण करण्यात आली. यामध्ये माजी सरपंच गंभीर जखमी झाला असून त्याच्या मित्रालाही दुखापत झाली आहे. ही घटना मांजरी येथील श्रीमान हॉटेलमध्ये बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरुषोत्तम उर्फ आण्णा शिवाजी धारवडकर ( रा- गणपती मंदिराजवळ घुले वस्ती मांजरी बुद्रुक ) असे जखमी झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. त्यांचा बांधकाम व्यवसायही आहे. याप्रकरणी नंदु शेडगे, चंद्रकांत घुले आणि तीन अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार धारवडकर माजी सरपंच असून त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे. ते बुधवारी रात्री एका लग्नसोहळ्यास गेले होते. लग्नानंतर ते मित्र आभिजित डोंगरे,प्रदीप शेवकर,संजय झुरुंगे अ से मिळुन मांजरी फार्म येथील नातेवाईक विजय कोद्रे यांच्या श्रीमान हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले. तेथे जेवण्याआधी मद्यपान करत असताना थोड्या वेळाने त्यांच्या ओळखीचे चंद्रकांत घुले व नंदु शेडगे हे दोघेही हॉटेलमध्ये आले. तेव्हा ते दोघे धारवडकर यांच्याच टेबलवर बसले. त्या दोघांनीही धारवडकर यांच्या बरोबर मदयपान केले. त्यानंतर सर्वांनी मिळुन जेवण केले.
जेवण झाल्यावर नंदु शेडगे याने वेटरकडे कुल्फी मागवली परंतु ब-याच वेळ कुल्फी न आल्याने संजय झुरुंगे याने नंदु शेडगे याची टिंगल करायला सुरुवात केली. त्यावरुन नंदु शेडगे हा चिडला व त्याच्यात आणी संजय झुरुंगे याच्यात किरकोळ बाचाबाची झाली. तेव्हा धारवडकर यांनी मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद मिटवला होता. त्यानंतर हॉटेलच्या बाहेर परत संजय झुरुंगे व नंदु शेडगे यांच्यात वाद चालु झाला.
नंदु शेडगे याने संजय झुरुंगे तसेच प्रदीप शेवकर यांना शिवीगाळ केल्याने त्या दोघांनी नंदु यास हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रदीप शेवकर व संजय झुरुंगे यांनी नंदु शेडगे यास कमरेचा बेल्टने मारहाण केली. तेव्हा चंदकांत घुले याने धारवडकर व त्यांचे मित्र प्रदीप शेवकर संजय झुरुंगे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नंदु शेडगे याने त्याच्या मोबाईल फोनवरुन कोणालातरी फोन लावला व त्यांना भांडण झाल्याचे सांगुन श्रीमान होटेल येथे येण्यास सांगितले. काही वेळातच तेथे दुचाकी मोपेडवरुन तिन अनोळखी तरुण तेथे आले. ते तिघे तरुण गाडीवरुन उतरुन धारवडकर व त्यांच्या मित्रांच्या दिशेने आले. तेव्हा त्यातील एक तरुणाने त्याच्या हातात असलेली पिस्टल धारवडकर यांच्या दिशेने रोखुन पप्पा कोण मारत आहे तुम्हाला असे नंदु शेडगे याच्याकडे बघुन विचारले.
यानंतर त्याच्या हातातील पिस्टलने धारवडकर यांच्या दिशेने एक गोळी फायर केली. त्यानंतर त्या तरुणाबरोबर असलेल्या ईतर दोन तरुणांनी व चंद्रकांत घुले यांनी हॉटेलच्या समोर पडलेल्या विटा उचलुन धारवडकर व त्यांच्या मित्रांच्या दिशेने मारण्यास सुरुवात केली. त्यांनी मारलेल्या पैकी एक विट धारवडकर डोक्यात डाव्या बाजुला लागली लागली तसेच अभिजीत डोंगरे यांना एक विट लागली.त्यानंतर ते तिघे तरुण नंदु शेडगे यास त्यांच्या दुचाकी मोपेडवर बसवुन तेथुन निघून गेले.