पुणे- पूलगेट ते हडपसर मेट्रो प्रकल्पाबाबत पीएमआरडीए आणि महामेट्रोने स्वतंत्रपणे अहवाल तयार करून सादर करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची (पुम्टा) बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी झाली. यावेळी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस पीएमआरडीए, महामेट्रो, जिल्हाधिकारी, पोलीस उपस्थित होते. सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीए करत आहे. तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गाचे काम महामेट्रो करत आहे.
तर, पीएमआरडीए आणि महामेट्रोने दोन्ही मार्गांचे विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. तर, खडकवासला ते मगरपट्टा सिटी-खराडी हा 28 किलोमीटर मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे. त्यानुसार पीएमआरडीएच्या विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर पूलगेट, हडपसर आणि लोणीकाळाभोर, तर एक फाटा सासवड रस्ता असा आहे.
तर महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पूलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा आहे. या दोन्ही मार्गावर पूलगेट ते हडसपर हा सुमारे 8 कि.मी. लांबीचा मार्ग एकत्रित असल्यामुळे तो कोणी विकसित करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर दोन्ही संस्थांनी अहवाल सादर करावा. या अहवालानंतर हा मार्ग कोणी करायचा याचा निर्णय घेतला जाणार आहे.