पिंपरी -क्रेडीटवर माल घेऊन व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. यातील चार जणांना पोलिसांनी अटक केली असून, 16 लाख 18 हजार 507 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाकड पोलिसांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली.
दीपक मुरलीधर पनपालीया (वय 51), अशोककुमार नैनचंद बाफना ऊर्फ अंकित जैन (दोघेही रा. सुरत), ललीतकुमार तुलशीराम खंडेलवाल (वय 37, रा. सिरोही, राजस्थान), जाकीर नुरमोहम्मद हुसैन ऊर्फ राजेश पुरी (वय 48, रा. सेंधवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार शाहरुख जानआलम खान (रा. बालोतरा, जि. बाडमेर, राजस्थान) याचा शोध पोलीस घेत आहेत.
याप्रकरणी व्हिक्टर जॉन पिटर (वय 46, रा. दापोडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीकडून बेडशीट, मॅट्रेस इत्यादी प्रकारचा माल होलसेलमध्ये विकत घेत सुरवातीला काही रक्कम दिली. फिर्यादीचा विश्वास संपादन करून 11 लाख 59 हजार 285 रुपये किमतीचा माल क्रेडीटवर (उधार) विकत घेऊन पळून गेले. तसेच साक्षीदार राजाराम नाथाजी भाटी हे देखील डिस्ट्रीब्युटर असून त्यांचीसुद्धा आरोपींनी आठ लाख आठ हजार 147 रुपयांचा माल क्रेडीटवर विकत घेऊन पळून गेले. त्यानंतर आरोपींनी मोबाइल बंद केले. तसेच त्यांनी गुन्हा करण्यासाठी बनावट नावे धारण केले असल्याचे निदर्शनास आले.
वाकड पोलिसांच्या पथकाने सुरत येथून आरोपी पनपालीया, अशोककुमार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी आरोपी जाकीर याच्या साथीने कट रचून गुन्हा केला असल्याचे सांगितले. ललीतकुमार याला खर्च करण्यासाठी कटात सामील केले. आरोपींनी अपहार केलेला माल विक्रीसाठी ललीतकुमार याच्याकडे दिला असल्याचे सांगितले. त्यानंतर राजस्थान येथून आरोपी ललीतकुमार याला ताब्यात घेतले. आरोपी अशोककुमार याच्यावर याचप्रकारचे पूर्वीचे आठ गुन्हे दाखल आहेत. आरोपी जाकिर याला मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले.