पुणे – विद्यार्थी दशेतच मुलांनी आपला आवडता खेळ निवडून त्याचा सराव करावा, खेळातील आपले उद्दिष्ट निश्चित करावे व नैपुण्य प्राप्त करून भारताचे नाव उज्वल करावे, असे आवाहन भारतीय महिला क्रिकेटचे संस्थापक सदस्य नरेंद्र निकम यांनी केले आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी- न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव-पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अशोक पलांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.शरद कुंटे, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, शाळेचे वित्त नियंत्रक डॉ.आशिष पुराणिक, डॉ.शरद आगरखेडकर हे उपस्थित होते. जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी जिगर आत्मविश्वास व तंदुरुस्ती विद्यार्थी दशेत खेळलेल्या खेळातूनच येते असे प्रतिपादन डॉ.शरद कुंटे यांनी याप्रसंगी केले.
डंबेल, घुंगुर काठी, निशाणी योगासने, लेझीम व मल्लखांब यांची मनोहारी व चित्त थरारक प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी याप्रसंगी सादर केली. सुधा लांडे,सारिका रणदिवे,सीमा ढोण,मल्हारी रोकडे,रमेश शेलार, महेश जोशी व माधवी पांढरकर यांनी ही विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके बसवली. लंगडी, खोखो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, धावणे, गोळा फेक, चेंडू फेक, जोर मारणे, बुद्धिबळ आदी सांघिक व वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा क्रीडा महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या.
कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या शालाप्रमुख मनिषा मिनोच्या यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख माधवी पांढरकर यांनी केले. प्रशालेचे पदाधिकारी सुरेश वरगंटीवार तसेच प्रभारी पर्यवेक्षक जयंत टोले व उषादेवी भोसले यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुहास देशपांडे यांनी केले. महेश जोशी यांनी आभार मानले.