पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयांमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाशी संबंधित रुग्ण दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने प्रशासन “अलर्ट’ झाले आहेत. याचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या जास्त आहे.
महापालिका हद्दीत 24 जुलैपर्यंत 33 पॉझिटिव्ह आणि 621 संशयित रुग्णांची नोंद केली आहे. ज्या ठिकाणी डासांची उत्पत्तीची ठिकाणे आढळून आली, तेथे 1 लाख 38 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दरम्यान, चिकनगुनियाच्या तीन प्रकरणांची नोंद झाली आहे, अशी माहिती महापालिकेच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.
खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडील दाखल रुग्णांची माहिती महापालिकेला देणे बंधनकारक असल्याने तसे पत्रही त्यांना देण्यात आले आहे. डासांपासून होणाऱ्या आजारांचे रुग्ण दाखल झाले असतील तर ती माहिती देणे आवश्यक आले आहे. यामध्ये रुग्णावर होणारे उपचार, रोगाची पुष्टी, चाचणीचा प्रकार आणि लक्षणे आणि रुग्णाचे तपशील महापालिकेला कळवणे बंधनकारक आहे, असे डॉ. देवकर म्हणाले.
आम्ही एसटी बस स्टॅंड, शाळा आणि बाजारपेठा येथे दर्शनी भागात होर्डिंग्ज आणि लाऊड स्पीकरवर घोषणा देऊन डेंग्यू आणि चिकनगुनिया जनजागृती मोहीम सुरू करणार आहोत, अशी माहिती डॉ. देवकर यांनी दिली. पुणे महापालिकेने धुर फवारणी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुणे महापालिकेच्या तुलनेत डेंग्युच्या संशयित रुग्णांची संख्या जास्त नोंदवली आहे. जुलै महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत एक हजार 151 संशयित रुग्णांची नोंद केली आहे.