पवनानगर -मावळ तालुक्यात एक रुपयात पीक विमा योजना लाभार्थी वाढवण्यासाठी तालुका कृषी अधिकारी मावळ यांच्या वतीने प्रचार रथ गावोगावी एक रुपयात पीक विमा भरण्याची प्रचार प्रसिद्धी करून माहिती देत आहे. मौजे काले येथे प्रचार रथाद्वारे शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे आवाहन करण्यात आले.
पंतप्रधान पीक विमा योजनेनुसार खरीप हंगाम 2023-24 साठी मावळ तालुक्यात यावर्षी फक्त भात, सोयाबीन, भुईमूग या पिकांचा समावेश करण्यात आला असून, विमा उतरविण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै 2022 असे मंडळ कृषी अधिकारी काळे कॉलनी प्रशांत डहाळे यांनी सांगितले.
1 रुपयात पीक विमा योजना या योजनेचा हेतू
राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी हा या योजने मागचा हेतू आहे.
योजनेचे वैशिष्ट्ये
कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात. नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना अधिसूचित केलेल्या पिकांसाठी व केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी असेल यातील जोखीमस्तर 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे.
जोखमीच्या बाबी
पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान पिकाच्या हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जसे की, पूर, दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळ इत्यादींमुळे 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास. पीक काढणीनंतर नुकसान झाल्यास पंचनामा करून नुकसान भरपाईस पात्र जसे की भात पेंढया सुकवणीस ठेवल्यास त्या बिगर मौसमी पावसाने होणारे नुकसान. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान जसे की गारपीट, ढगफुटी इत्यादी.
पीक विमा योजनेत सहभागासाठी लागणारी कागदपत्रे
ज्या क्षेत्रावरील पिकाचा विमा काढावयाचा आहे त्या शेत जमिनीचा 7/12 व 8 अ, स्वयंघोषणापत्र, आधार कार्ड, बॅंक खाते क्रमांक इत्यादी. शेतकऱ्यांनी पीक विमा भरणे कामी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, सोसायटी सचिव, महा ई सेवा केंद्र यांच्याशी पीक विमा योजनेत सहभागासाठी संपर्क साधावा.