पुणे – पावसाने दिलेली उघडीप आणि नागरिकांमध्ये करण्यात आलेली जनजागृती यामुळे गेल्या ऑक्टोबर महिन्यात शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण सप्टेंबरच्या तुलनेत घटले आहेत. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे रुग्ण 13 टक्क्यांनी, तर चिकुनगुनियाचे 47 टक्क्यांनी घटले आहेत. करोनापाठोपाठ दिवाळीकाळात पुणेकरांसाठी डेंग्यू आणि चिकुनगुनियाची घटती रुग्णसंख्या ही बाब दिलासादायक ठरली आहे.
डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे दोन्ही आजार डासांपासून पसरतात. डासांची उत्पत्ती ही घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी साठलेल्या पाण्यात होते. तीदेखील स्वच्छ पाण्यात होते. यामध्ये फ्रीज, फुलांच्या कुंड्या, गच्चीवरील अडगळीतील सामान अशा ज्या ठिकाणी पाणी साठून राहते त्यामध्ये होत असल्याचे आढळून आलेले आहे. सप्टेंबर महिन्यात शहरात डेंग्यूचे 192 रुग्ण आढळले होते तर चिकुनगुनियाचे 80 रुग्ण आढळले होते.
ती संख्या ऑक्टोबरमध्ये अनुक्रमे 168 आणि 38 झाली आहे. सप्टेंबरमधील रुग्णसंख्या सर्वाधिक ठरली होती. तर, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे प्रत्येकी 86 रुग्ण आढळले होते आणि चिकुनगुनियाचे अनुक्रमे 73 आणि 16 रुग्णांची नोंद झाली होती. आतापर्यंत शहरात डेंग्यूचे 563 तर चिकुनगुनियाचे 218 रुग्ण आढळून आले आहेत.
पावणेदोन लाख रुपयांचा दंड वसूल
डेंग्यू डासांची अंडी आणि अळी सापडल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रथम नोटीस देण्यात येते आणि नंतर दंड करण्यात येतो. यानुसार यावर्षी आरोग्य विभागाने 2,359 नोटीस पाठवल्या असून, डासोत्पत्तीप्रकरणी 1 लाख 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ऑक्टोबरमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण कमी झाले आहेत. सध्या ही रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. पाणी साठू न देणे किंवा अडगळ काढून टाकणे. घरात किंवा आजूबाजूला पाणी साठवले तर डास होतात अन्यथा नाही. जर रुग्णांना ताप, थंडी आणि अंगावर पुरळ असतील तर डॉक्टरांकडे जा.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे मनपा