पुणे – लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शहरातील सार्वजनिक भिंतींवर भाजपकडून जाहिराती केल्या जात आहेत. अशा प्रकारे शहर विद्रूपीकरण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून (शरदचंद्र पवार) करण्यात आली आहे.
या विरोधात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात मित्रमंडळ चौक, पर्वती येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे लोकांच्या पुढे जाण्यासाठी घाबरत असलेल्या भारतीय जनता पार्टीने “दिवार लेखन” अभियान राबवत शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी भाजपच्या घोषणा रंगवून सुंदर पुणे शहर विद्रूप करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे महापालिकेने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जगताप यांंनी यावेळी केली आहे.